पनवेल महापालिका निवडणूक बिनविरोध नाहीच, नागरिक नोटा बटण दाबणार पण निवडणूका होणारच !

 पनवेल महापालिका निवडणूक बिनविरोध नाहीच, नागरिक नोटा बटण दाबणार पण निवडणूका होणारच !  



बिनविरोध उमेदवाराविरुद्ध नोटा लढत करण्याची पत्रकार मित्र असोसिएशनची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्राद्वारे मागणी, कायदेशीर बाजू अ‍ॅड. संतोष खांडेकर सांभाळणार


पनवेल / प्रतिनिधी
     निवडणूक ही लोकसेवेची संविधानिक संधी असून ती केवळ पदप्राप्तीपुरती मर्यादित न राहता लोकशाहीतील जनतेच्या हक्क, अधिकार आणि राजकीय इच्छाशक्तीची कसोटी ठरत असते. मात्र सध्याच्या काळात पनवेलसह संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेक उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ही बाब लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना आव्हान देणारी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
    पनवेलमधील पत्रकार मित्र असोसिएशनच्यावतीने व ऍड. संतोष खांडेकर यांनी या महत्त्वपूर्ण विषयाची दखल घेण्यात आली. निवडणूक प्रक्रियेत मतदारांना उमेदवारांच्या विरोधात आपली असहमती नोंदविण्याचा अधिकार आहे. एखाद्या मतदाराला निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार योग्य वाटत नसेल, तर तो ‘नोटा’ (None of the Above) हा पर्याय निवडू शकतो. नोटा हा पर्याय मतदारांच्या नकारात्मक कौलाचे प्रभावी माध्यम असून तो लोकशाही अधिक सक्षम करतो, असे मत पत्रकार मित्र असोसिएशनचे कार्याध्यक्ष नितीन जोशी यांनी मांडले. नोटाच्या माध्यमातून मतदारांना आपली असहमती गोपनीय पद्धतीने नोंदविण्याचा अधिकार मिळतो. मात्र बिनविरोध निवडणुकीच्या प्रक्रियेत नोटा पर्यायाचा विचार न होणे हे लोकशाहीच्या हक्कांवर गदा आणणारे आहे. त्यामुळे निवडणूक अधिकारी वर्गाने या बाबीचा निःपक्षपातीपणे विचार करून संविधानिक अधिकारांच्या आधारे योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी अ‍ॅड. संतोष खांडेकर यांनी केली.
     या संदर्भातील निवेदन पनवेल मित्र पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक, कार्याध्यक्ष नितीन जोशी तसेच अ‍ॅड. संतोष खांडेकर यांनी पनवेल प्रांत अधिकारी तथा निवडणूक अधिकारी पवन चांडक यांना सादर केले. सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन, आवश्यक असल्यास पुढील कायदेशीर लढा न्यायालयात जनतेच्या सहभागातून लढविण्यात येईल, अशी प्रतिक्रिया यावेळी पत्रकार मित्र असोसिएशनचे कार्याध्यक्ष नितीन जोशी यांनी व्यक्त केली. नोटा अधिकाराच्या जनजागृतीसाठी नागरिकांनी जागरूक राहून लोकशाही बळकट करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी पावन चांडक यांच्याशी चर्चा करताना नितीन जोशी यांनी सांगितले कि एखाद्या मतदाराला बिनविरोध घोषित केलेला उमेदवार मान्य नाही तर त्यांना संविधानाने नोटा हा पर्याय दिलेला आहे त्यामुळे नोटा विरुद्ध बिनविरोध मतदार अशी निवडणूक लढवून मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार द्यावा याविरोधात न्यायालयात रिट पिटिशन दाखल करणार असून कायदेशीर बाजू अ‍ॅड. संतोष खांडेकर लढवणार आहेत.