बारा वर्षीय तनय लाडचा जलतरण कामगिरीबद्दल आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते सत्कार

 पनवेल महानगरपालिका

 जनसंप


बारा वर्षीय तनय लाडचा जलतरण कामगिरीबद्दल आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते सत्कार

पनवेल, दि.10: सध्या कामोठे येथे राहणारा बारा वर्षीय पनवेलचा रहिवासी असलेला महाडचा बारा वर्षीय तनय तुषार लाड याने गेटवे ऑफ इंडिया ते अटल सेतू (१७किमी) हे अंतर केवळ २ तास २६ मिनिटांत पार करत सर्वात वेगवान जलतरणपटू होण्याचा मान मिळवला आहे. या अभूतपूर्व जलतरण कामगिरी करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या जलतरण कामगिरीबद्दल आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते सत्कार आज त्याचा पालिका मुख्यालयात सत्कार करण्यात आला.

आई वडिलांच्या मार्गदर्शनाबरोरबच त्याच्या या कामगिरीत  प्रशिक्षकांचा मोलाचा सहभाग लाभला आहे. पलावा येथील प्रसिद्ध जलतरणपटू आणि मार्गदर्शक रूपाली रेपाळे व अनिरुद्ध महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली तनय प्रशिक्षण घेत आहे. तनयच्या या विक्रमी कामगिरीमुळे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्याच्या कुटुंबीयांबरोबरच प्रशिक्षक, मित्र मंडळी आणि संपूर्ण शाळेतील शिक्षक-विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

तनयने २ मार्च २०२५ रोजी सकाळी ८.४६ वाजता गेटवे ऑफ इंडिया येथून अरबी समुद्रात उडी घेतली आणि भरतीचे लहरी प्रवाह, वाऱ्याचा जोर आणि हवामानाच्या स्थितींशी झुंज देत हा लाटांवरचा खडतर प्रवास ११.१४ वाजता अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतु येथे पूर्ण केला. त्याने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. त्याच्या या अपूर्व यशामुळे तो जलतरण क्षेत्रात एक नवीन प्रेरणादायी उदाहरण बनला आहे.

तनय सध्या न्यू होरायझन पब्लिक स्कूल, पनवेल येथे इयत्ता सहावीत शिक्षण घेत आहे. तसेच याआधी २०२४ मध्ये त्याने थायलंडमध्ये ओशियन मॅन स्पर्धेत कांस्यपदक, संकरॉक ते गेटवे, पेरियार कोची केरळ, विजयदुर्ग, रंकाळा कोल्हापूर येथे रौप्यपदक आणि मालवण, पोरबंदर स्पर्धेत सहभाग घेऊन आपल्या जलतरण कौशल्यांचे शानदार प्रदर्शन केले होते. खुल्या समुद्रात स्विमिंग हा अत्यंत कठीण व धाडसी क्रीडा प्रकार आहे. 

समुद्राच्या अनिश्चितहवामान आणि जलचरांचा सामना करत स्पर्धक प्रत्येक क्षणी जिंकण्याच्या जिद्दीने पोहत असतो. तनयने या आव्हानांना समर्थपणे तोंड दिले. त्याच्या या यशामागे त्याची वयाच्या सहाव्या वर्षांपासूनची कठोर मेहनत, मानसिक तयारी, कठोर परिश्रम, नियमित सरावासाठी रोज पनवेल ते पलावा-डोंबिवली प्रवास आणि आत्मविश्वास याच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले आहे. त्याने आपले कौशल्य, मेहनत आणि चिकाटी यांचे उत्तम उदाहरण सादर केले आहे. एका सर्वसामान्य जलतरणपटूचे विशेष गुण ओळखून त्यांना सर्व कसोटीत उत्तीर्ण करणे यामध्ये रूपाली रेपाळे आणि अनिरुद्ध महाडिक यांचे योगदान उल्लेखनीय आहे.