पनवेलमध्ये 'सहकारी गृहनिर्माण संस्थांचा स्वयं पुनर्विकास' मार्गदर्शनपर शिबिर
पनवेल (प्रतिनिधी) पनवेल-सिडको सहकारी गृहनिर्माण संस्था संघ मर्यादित यांच्या विद्यमाने आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या सहकार्याने "सहकारी गृहनिर्माण संस्थांचा इमारतींचा स्वयं पुनर्विकास" या विषयावर मार्गदर्शनपर शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार दिनांक २३ मार्च रोजी सकाळी १० वाजता पनवेल शहरातील विरुपाक्ष हॉल येथे होणार आहे. या शिबिराला मार्गदर्शक म्हणून विधानपरिषदेतील भाजप गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत ठाकूर, सहकारी संस्था पनवेलचे सहाय्यक निबंधक भारती काटूळे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
गृहनिर्माण संस्था आणि रहिवाश्यांना स्वयं पुनर्विकासाच्या संकल्पनेची सखोल माहिती मिळावी, पुनर्विकास प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, योजना आणि इतर विषयांवर या शिबिरात मार्गदर्शन होणार आहे. त्यामुळे या शिबिराचा गृहनिर्माण संस्था व रहिवाश्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पनवेल-सिडको सहकारी गृहनिर्माण संस्था संघ मर्यादितचे अध्यक्ष कुंडलिक काटकर, सल्लागार व माजी नगरसेवक नितीन पाटील, सचिव भरत मोरे यांनी केले आहे.