कुष्ठरोग निर्मूलनासाठी शासनाचा पुढाकार; सेवाभावी संस्थांच्या अनुदानात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर – मंत्री प्रकाश आबिटकर

 कुष्ठरोग निर्मूलनासाठी शासनाचा पुढाकार; सेवाभावी संस्थांच्या अनुदानात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर – मंत्री प्रकाश आबिटकर  


आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी उपाययोजना आणि सेवाभावी संस्थांच्या अनुदानात वाढ करण्याची केली होती मागणी 

पनवेल (प्रतिनिधी) राज्यात कुष्ठरोग निर्मूलन करण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात आणि कुष्ठरोगांसाठी कार्य करणाऱ्या आनंदवन, तपोवन व इतर सेवाभावी संस्थांना देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्याची मागणी तारांकित प्रश्नाद्वारे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी  करून या महत्वपूर्ण विषयावर शासनाचे लक्ष वेधले. त्यानुसार उपाययोजनेसोबतच कुष्ठरुग्णांसाठी कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांना शासनाकडून सध्या दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नियोजन व वित्त विभागाकडे सादर करण्यात आल्याची माहिती, राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे. 
     राज्यात राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणी सन १९५५-५६ मध्ये सुरु केली असली तरीही अद्यापही मोठया प्रमाणात कुष्ठ रुग्ण आढळून येत असून एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत २० हजार कुष्ठरोग रुग्ण आढळले असून आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणानुसार कुष्ठरोग निमूर्लन करण्यात आलेल्या ठिकाणीही कुष्ठरोगाचा प्रसार होत असल्याचे देखील निदर्शनास आले आहे. राज्यात कुष्ठरोगांसाठी कार्य करणाऱ्या आनंदवन, तपोवन व इतर सेवाभावी संस्थांना कुष्ठरोगाची देखभाल व औषधोपचार करण्यासाठी प्रती रुग्ण देण्यात येणारे अनुदान अत्यंत अल्प असून त्यामध्ये गत १२ वर्षात कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याने संस्थाना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचेही जानेवारी २०२५ मध्ये निदर्शनास आले. सर्वोच्च न्यायालयाने सन २०१४ मध्ये कुष्ठरूग्णांच्या पुर्नवसनासाठी सर्वकष योजना (पॉलिसी) तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शासनावर दिली आहे, त्या अनुषंगाने या प्रकरणी शासनाने चौकशी करुन कुष्ठरोगाचे पूर्णतः निर्मूलन करण्यासह कुष्ठरोग प्रसारावर आळा घालणे तसेच कुष्ठरोगांसाठी कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांना प्रती रूग्ण देण्यात येणारे अनुदान वाढविण्याबाबत कोणती कार्यवाही केली, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दाखल केला होता. 
        या प्रश्नावर मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत राज्यात एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत एकूण २०,००१ नवीन कुष्ठरुग्ण आढळले आहेत व त्या सर्वांना बहुविध औषधोपचाराखाली आणण्यात आले आहे. राज्यातील कोणत्याही भागात कुष्ठरोग निर्मूलन करण्यात आल्याचे अद्याप घोषित करण्यात आलेले नाही. कुष्ठरोगांसाठी कार्य करणाऱ्या आनंदवन, तपोवन व इतर सेवाभावी संस्थांना कुष्ठरोगाची देखभाल व औषधोपचार करण्यासाठी प्रती रुग्ण देण्यात येणारे अनुदान अत्यंत अल्प असून त्यामध्ये गत १२ वर्षात कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याने संस्थाना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची बाब अंशतः खरी आहे.  शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक कुनिका-२०११/प्र.क्र.३२१/आरोग्य-५, दिनांक २१ मार्च, २०१२ अन्वये राज्यात कुष्ठरुग्णांसाठी कार्य करणाऱ्या रुग्णालयीन तत्वावरील १३ स्वयंसेवी संस्थांना दरमहा प्रती कुष्ठरुग्ण २२०० रुपये आणि पुनर्वसन तत्वावरील १६ स्वयंसेवी संस्थांना दरमहा प्रती कुष्ठरुग्ण  २००० रुपये अनुदान शासनाकडून सध्या देण्यात येत असून राज्यात कुष्ठरोगावर आळा घालण्यासाठी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार नवीन कुष्ठरुग्ण शोधून त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणून कुष्ठरोगाच्या प्रसाराची साखळी खंडीत करण्यावर राज्यात भर देण्यात येत आहे. त्यानुसार, राज्यात नियमित सर्वेक्षणासह अतिजोखमीच्या लोकसंख्येत कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) ही मोहिम सन २०२३ पासून दरवर्षी राबविण्यात येत आहे. तसेच, यापूर्वी निदान झालेल्या कुष्ठरुग्णांच्या सहवासात असलेल्या व्यक्तींचीही कुष्ठरोगासाठी तपासणी करण्यात येत आहे. तसेच, केंद्र शासनाकडील मार्गदर्शक सुचनेनुसार राज्यात दरवर्षी कुष्ठरुग्ण शोध मोहीमही राबविण्यात येत आहे. मागील वर्षामध्ये शुन्य कुष्ठरुग्ण असलेल्या गावांमधील सर्व जनतेची कुष्ठरोगासाठी तपासणी करण्यात येत आहे. कुष्ठरोगाविषयी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येते व यामध्ये दिनांक २६ जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये कुष्ठरोगाविषयी शास्त्रीय माहिती देण्यात येते. तसेच, स्पर्श कुष्ठरोग जनजागृती पंधरवडयादरम्यान जिल्हास्तरावर रॅली, शाळा व महाविद्यालयांमध्ये कुष्ठरोगविषयक निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व प्रश्न मंजुषा स्पर्धा, महिला मंडळ सभा, हस्तपत्रिका वाटप, मेगाफोनव्दारे प्रचार, आरोग्य पत्रिकेत लेख, पथनाटय इ.चे आयोजन करण्यात येते. त्याचबरोबरीने जिल्हा व तालुका मुख्यालयाच्या वर्दळीच्या ठिकाणी कुष्ठरोग विषयक होर्डिंग्स द्वारे जनजागृती करण्यात येते. आरोग्य संस्था व शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी मराठीतील बॅनर पोस्टरद्वारे आणि मोक्याच्या ठिकाणी भिंतीवर कुष्ठरोग विषयक संदेश लिहून तसेच आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्तीव्दारे गृहभेटीदरम्यान प्रत्यक्ष भेटी देवून कुष्ठरोगाविषयी जनजागृती करण्यात येते, अशी माहिती देऊन राज्यात कुष्ठरुग्णांसाठी रुग्णालयीन व पुनर्वसन तत्वावर कार्य करणाऱ्या सेवाभावी स्वयंसेवी संस्थांना प्रती कुष्ठरुग्ण शासनाकडून सध्या दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नियोजन व वित्त विभागाकडे सादर करण्यात आल्याचीही माहिती नामदार प्रकाश आबिटकर यांनी लेखी उत्तरात दिली. 

Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image