नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न विधिमंडळात-प्रदूषण रोखण्यासाठी कार्यवाही करण्याची आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी

नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न विधिमंडळात-प्रदूषण रोखण्यासाठी कार्यवाही करण्याची आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी 



पनवेल (प्रतिनिधी) ठाणे व रायगड जिल्ह्यातील एमआयडीसीमधील अनेक कंपन्यांतून सोडण्यात येणाऱ्या रसायन मिश्रित पाण्यामुळे नद्यांच्या प्रदूषणात वाढ झाल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी मुंबईत सुरु असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न दाखल करून या विषयावर शासनाचे लक्ष वेधले. 
        पनवेल तालुक्यातील तळोजा एमआयडीसीतील घातक व रसायन मिश्रीत पाणी कासाडी नदीत सोडणे तसेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, उल्हासनगर, डोंबिवली येथील एमआयडीसीमधुन अनेक कंपन्या तसेच जिन्स वॉश करणाऱ्या कंपन्या रसायन मिश्रीत पाणी बालधुनी व उल्हासनदीत सोडत असल्याने नदीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन नागरिक तसेच शेती व जलचर प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, पेण तालुक्यातील डोलवी येथील धरमतर खाडीच्या बाजुला जे.एस.डब्ल्यू कंपनी तसेच अलिबाग तालुक्यातील शहाबाज येथील पी.एन.पी कंपनीतील रसायन मिश्रित दूषित पाण्यामुळे मच्छिमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. त्या अनुषंगाने याबाबत अभ्यास करण्यासाठी वरिष्ठ वैज्ञानिक तथा वैज्ञानिक कारभार प्रमुख, केंद्रिय सागरी मस्त्यकी संशोधन संस्था मुंबई  यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीमार्फत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, त्याचबरोबरीने या सर्व ठिकाणच्या नद्यांचे प्रदूषण रोखण्याबाबत अनेक लोकप्रतिनिधींनी व नागरिकांनी वेळोवेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे व प्रशासनाकडे तक्रार व निवेदने दिले असून यासंदर्भात कोणती कार्यवाही करण्यात आली. तसेच या सर्व प्रकरणांची शासनाने सखोल चौकशी करुन प्रदूषण रोखणे तसेच यास जबाबदार असणाऱ्या कंपन्या व दोषी अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुध्द कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी अधिवेशनात दाखल केला होता. 
          राज्याच्या पर्यावरण व वातावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या प्रश्नावर दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले कि, तळोजा एमआयडीसीतील घातक व रसायन मिश्रीत पाणी कासाडी नदीत सोडणे आणि ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, उल्हासनगर, डोंबिवली येथील एमआयडीसीमधुन अनेक कंपन्या तसेच जिन्स वॉश करणाऱ्या कंपन्या रसायन मिश्रीत पाणी बालधुनी व उल्हासनदीत सोडले जात असल्याने नदीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन नागरिक तसेच शेती व जलचर प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे निदर्शनास आल्याची बाब अंशतः खरी आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीमधील औद्योगिक सांडपाणी भूमिगत पाईपलाईनद्वारे सी.ई.टी.पी. मध्ये एकत्रित करून राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेमार्फत निर्देशित स्थळी विसर्ग करण्यात येते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत सामुहिक सांडपाणी यंत्रणेची वेळोवेळी पाहणी करण्यात येते व सामूहिक सांडपाणी यंत्रणेमध्ये त्रुटी आढळून आल्यास संबंधितांना कारणे दाखवा नोटीस तसेच प्रस्तावित निर्देश बजावण्यात येतात. ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील मोठ्या व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांनी औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया संयंत्रणा उभारली असून प्रक्रियाकृत औद्योगिक सांडपाणी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेमार्फत निर्देशित स्थळी विसर्ग करण्यात येते. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत बेकायदेशीर जीन्स वॉश उद्योगांवर नियमानुसार वेळोवेळी कारवाई करण्यात येते. कृषी विभाग तसेच मत्स्यव्यवसाय विभागाच्या अहवालात प्रश्नाधीन विषयास अनुसरून कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे नमूद करण्यात आल्याची माहिती नामदार पंकजा मुंडे यांनी दिली आहे. तसेच मत्स्यव्यवसाय विभागाकडून प्राप्त अहवालानुसार धरमतर खाडीतील मच्छीमारांच्या समस्या तसेच सागरी किनारपट्टीवरील प्रदूषणामुळे मत्स्योत्पादनावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी दि.२१ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार दहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून सदर समितीच्या अद्यापपर्यंत एकूण १० बैठका पार पडल्या आहेत. सदर समितीमार्फत धरमतर खाडीची पाहणी करून धरमतर खाडीतील मच्छीमारांची माहिती संकलित करण्याची कार्यवाही सुरू आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नदी प्रदूषणाविषयी प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत पाहणी करण्यात येते व नियमानुसार वेळोवेळी आवश्यक ती कारवाई करण्यात येते, असे नामदार पंकजा मुंडे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हंटले आहे.