माथाडी कामगार देशोधडीला लागेल असा कोणताही निर्णय सरकारला घेऊ देणार नाही-माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील

माथाडी कामगार देशोधडीला लागेल असा कोणताही निर्णय सरकारला घेऊ देणार नाही-माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील 

नवीमुंबई दि.२३ अण्णासाहेब पाटील यांनी निर्माण केलेल्या माथाडी कामगार कायद्यात बदल करण्यासंदर्भात सध्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने काही बदल करण्याचे ठरविले आहेत त्यासंदर्भात विधेयकही पास केले आहे, पण आम्ही कोणत्याही परस्थितीत माथाडी कामगारांवर अन्याय होईल किंवा माथाडी कामगार देशोधडीला लागेल असा कोणताही निर्णय सरकारला घेऊ देणार नाही याची ग्वाही आजच्या अण्णासाहेबांच्या ४३ व्या पुण्यतिथीनिमीत्त आपल्या सर्व माथाडी कामगारांना देत आहे असे उद्‌गार माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी काढले. 

महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने माथाडी कामगारांचे आराध्य दैवत कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त माथाडी भवन, नवीमुंबई येथील सभागृहात आयोजित केलेल्या सभेमध्ये माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील बोलत होते व ते पुढे असेही म्हणाले की, आपल्यावर सर्वांची नजर आहे. वाईट प्रवृत्ती सातत्याने जलदगतीने डोके वर काढत आहेत आणि यासारख्यांना साथ देणारे व माथाडी चळवळ संपविणारे आपल्यातलेच आहेत असेही त्यांनी वक्तव्य केले. 

आता आपल्याला आत्मचिंतनाची गरज असून, माथाडी चळवळीमध्ये आपण कोठे कमी पडतोय याचाही वेध घेतला पाहिजे. घुसखोर माथाडी कामगारांनी खंडणी वसुलीच्या नावाखाली माथाडी चळवळीत आपले साम्राज्य निर्माण केले आहे ते नेस्तनाभूत करण्याचं जबरदस्त आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे. मी गुंडाशी कधीही हातमिळवणी केली नाही आणि करणारही नाही असे निर्भिडपणे त्यांनी सांगितले. तर नवीमुंबईतील माथाडी कामगारांची घरे उध्दवस्त करण्याचा फार मोठा डाव नवीमुंबई महानगरपालिका व अन्य यंत्रणांच्या पंडयंत्राच्या माध्यमातून अधिकारी वर्ग नेत्यांच्या फायदयासाठी करीत आहे हे कधीही खपवून घेतले जाणार नाही. यासाठी आम्ही तिव्र आंदोलन छेडू व विरोध करु, माथाडी कामगारांची घरे वाचवू असेही नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी सांगितले. 

या सभेमध्ये बोलताना माजी खासदार संजिव नाईक असे म्हणाले की, माथाडी कामगारांचे आराध्यदैवत अण्णासाहेब पाटील यांच्या कार्यामुळेच माथाडी चळवळीमध्ये नवनवीन नेतृत्व निर्माण झाले. हेच नेतृत्व आज खऱ्या अर्थाने माथाडी चळवळ तिचे अस्तित्व टिकवूण ठेवण्याचे काम जोमाने करीत आहे. राजकिय स्पष्टता, वैचारिक स्पष्टता नसली तरीही याच नेतृत्वाने माथाडी कामगारांच्या चळवळीसाठी एकोप्याची भुमिका घेवून माथाडी चळवळीला अबाधित ठेवले आहे. आपली एकी हिच अण्णासाहेबांना आजच्या दिवशी सन्मानाची श्रध्दाजंली आहे आणि ही एकी अशीच टिकून रहावी अशी अपेक्षा संजिव नाईक यांनी व्यक्त केली ते पुढे असेही म्हणाले की, एकत्र राहण्याची भावना आपल्या सर्वांमध्ये सातत्याने जागृत राहिली पाहीजे. यासाठी आपल्या चळवळीसमोर भविष्यात निर्माण होणाऱ्या कोणत्याही समस्यांचे निवारण करण्यासाठी गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे नाईक परिवार आपल्या चळवळीच्या नेहमीच पाठिशी राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. 

या सभेत आपल्या भाषणात माथाडी संघटनेचे कार्याध्यक्ष आमदार व माजी मंत्री शशिकांत शिंदे असे म्हणाले की, ज्या समाजासाठी अण्णासाहेबांनी अथक प्रयत्न करुन मराठा चळवळ उभी केली आणि त्यासाठी बलिदान दिले. हे अण्णासाहेबांच्या कार्यकिर्दितील महत्वाचा भाग आहे. अण्णासाहेब दोन चळवळी चालवत होते एक माथाडी चळवळ आणि दुसरी मराठा चळवळ माथाडी कामगार चळवळीच्या माध्यमातून त्यांनी ऐतिहासीक माथाडी कामगार कायदा व इतर सुविधा माथाडी कामगारांना मिळवून दिल्या. आज त्याच माथाडी कामगार कायद्यात बदल करण्याचे डावपेच चालू आहेत. ही मागणी अनेक वर्षाची आहे पण अण्णासाहेबाचं ऐतिहासीक कार्य आणि त्यांच्या नावाचं वलय यामुळे सरकार ही कायदयात बदल करण्यास धजावत नाही आणि धक्का लावण्याचेही धैर्य होत नाही. गेल्या पाच वर्षांच्या व त्याच्या आधीच्याही सरकारने माथाडी चळवळीच्या विरोधात निर्णय घेण्याचे प्रयत्न केले. आजही माथाडी कामगार कायद्यात बदल करण्यासाठी कांही अदृष्य शक्ती कार्यरत आहेत. पण आम्ही माथाडींच्या हिताला धक्का लागेल किंवा त्यांच्यावर अन्याय होईल असे कोणतेही बदल आम्ही सरकारला करु देणार नाही. आता सुरु असलेल्या अधिवेशनात माथाडी कामगार कायद्यात बदल करण्याचे एक विधेयक सादर करण्यात आले आहे त्याला आम्ही सर्वांनी कडाडून विरोध केला आहे. विधानपरिषदेत मी स्वतः सुमारे ३ तास या कायद्याबाबत माझ्या भाषणात आपल्या सर्वांची भुमिका स्पष्ट केली आहे व भविष्यात या कायद्याच्या संदर्भात आम्ही सातत्याने जागृत राहू असेही शशिकांत शिंदे यांनी सांगितले व माथाडी कामगार कायदा विधेयकाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी या विधेयकाच्या चर्चेनिमित्त सभागृहात माथाडी कामगारांच्या हिताबाबत स्पष्ट भुमिका मांडल्याबाबत त्यांचेही शशिकांत शिंदे यांनी आभार मानले.

माथाडी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले की, अण्णासाहेब हे माथाडी कामगारांचे द्रष्टेनेते होते. त्यांना दुरदृष्टी होती, त्यांच्या विचारांचा आवाका मोठा होता आणि म्हणूनच त्यावेळचे त्यांचे विचार आज आवश्यक वाटत आहेत, ते राष्ट्रवादी विचार व देशाभक्तीचा विचार करणारे अभ्यासू नेते होते. त्यांच्या आजच्या पुण्यतिथिनिमीत्त आयोजित मेळाव्यात मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो व आपली माथाडी चळवळ अभेद्य ठेवण्यासाठी व बळकट करण्यासाठी आपण सर्व सातत्याने जागृत राहूया, असे आव्हानही त्यांनी तमाम माथाडी कामगारांना केले. 

या सभेचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन संघटनेचे संयुक्त सरचिटणीस व जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख यांनी केले. या मेळाव्यास माजी आमदार विजय सावंत, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे-पाटील, उपमहाव्यवस्थापक आकाश मोरे, प्राना फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्राची नरेंद्र पाटील, ग्रोमा असोसिएशनचे अध्यक्ष मुयर सोनी, संघटनेचे अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, दिलीप खोंड, संघटनेचे सचिव आमदार मनोज जामसुतकर पतपेढीचे व्यवस्थापकीय संचालक रमेश अण्णासाहेब पाटील, माथाडी हॉस्पीटलचे मुख्य वैद्यकिय अधिकारी हणमंतराव पाटील, संघटनेचे उपाध्यक्ष सुर्यकांत पाटील, संघटनेच्या कायदेशीर सल्लागार अॅड. भारतीताई पाटील व माथाडी संघटना, माथाडी पतपेढी, माथाडी ग्राहक सोसायटीचे पदाधिकारी आणि तमाम माथाडी कामगार उपस्थित होते.

Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image