डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात विविध विभाग, सुविधांचे लोकार्पण


डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात विविध विभाग, सुविधांचे लोकार्पण





पनवेल (प्रतिनिधी) डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाचा आवाका वाढत चालला असून चांगली सेवा मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण येथे उपचाराकरिता दाखल होत आहेत. रुग्णसेवा ही अतिशय महत्त्वाची आहे. म्हणूनच या रुग्णालयात असणारे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही वेळोवळी प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.

           पनवेल शहरातील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात सुसज्ज नेत्र शस्त्रक्रिया गृह, वातानुकूलित शवागृह, मॅमोग्राफी मशीन, आयुष उद्यान, केंद्रीय निर्जंतुकीकरण पुरवठा विभाग यांचे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार विक्रांत पाटील यांच्यासह उपस्थित अन्य मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
       कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी पवन चांडक, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, सार्वजनिक विभाग कार्यकारी अभियंता संजीवनी कट्टी, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर सोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक शाकीर पटेल, माजी महापौर कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक राजू सोनी, डॉ. अरुणकुमार भगत, माजी नगरसेविका आरती नवघरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक गीते, गौरव कांडपिळे आदी उपस्थित होते.
        या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हंटले की, रुग्णसेवा हीच जनसेवा मानून डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर काम करीत असतात आणि रुग्ण त्यातून पूर्ण बरे होत असतात. ही जनसेवा बरेच काही देऊन जाते. त्यामुळेच आज उपजिल्हा रुग्णालयाची विश्वासहर्ता लोकांमध्ये वाढत चालली असून मोठ्या प्रमाणात रुग्ण येथे उपचार येत असतात व रुग्ण बरे होऊन जातात त्याचाच मोठा आनंद होतो.
       सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर सोमण यांनीसुद्धा त्यांच्या कंपनीच्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून 10 लाखांची मोफत औषधे रुग्णांना उपलब्ध करून दिली आहेत. डॉ. गिरीश गुणे यांच्या रोटरी क्लबच्या माध्यमातूनसुद्धा येथे मदत होते असते. माजी नगरसेवक राजू सोनी यांनीदेखील या ठिकाणी आयुष उद्यान स्वखर्चाने उभे करून दिले आहे. या सर्वांनीच सामाजिक भावनेतून केलेले कार्य हे कौतुकास्पद असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले. आमदार विक्रांत पाटील यांनी, आपले उपजिल्हा रुग्णालय सर्व सुविधांनी सुसज्ज झाले आहे. त्यामुळे या रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचार्‍यांनी नागरिकांसोबत संवाद साधून त्यांची मानसिकता बदलविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
           माजी महापौर कविता चौतमोल यांनी सांगितले की, आमदार प्रशांत ठाकूर यांनी पहिल्यापासूनच या उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न केले. कोरोना काळातसुद्धा जास्तीत जास्त रुग्ण येथे दाखल झाले होते व त्यांची चांगली सेवा झाली. आज या रुग्णालयाचे अत्याधुनिक रूप साकारले जात आहे. यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांचा सिंहाचा वाटा आहे.
सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर सोमण यांनीसुद्धा या उपजिल्हा रूग्णालयाचे कौतुक करताना सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलला लाजवेल अशा अत्याधुनिक सोयीसुविधा येथे रुग्णांसाठी उपलब्ध झाल्याचे सांगितले. 25 मृतदेह ठेवण्यासाठी शवागृह, डायलिसिस सेंटर, डोळ्याची तपासणी आदी सेवांचा फायदा गरीब रुग्णांना होणार आहे. विस्टा फूडच्या माध्यमातून नेहमीच रुग्णालयाला मदत करत असतो. यंदाही त्यांच्या सीएसआर फंडातून 10 लाखांची औषध दिल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभाऊ खरात यांनी केले.