जागतिक महिला दिनानिमित्त महिलांकरिता विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये 08 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत विशेष आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांना महिलांचा मोठ्या प्रमाणात उत्तम प्रतिसाद लाभला.
महानगरपालिकेची 3 रुग्णालये, 2 माता बाल रुग्णालये व 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या स्तरावर असंसार्गिक रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत विशेष आरोग्य शिबीराचे आयोजन करून महिलांचा रक्तदाब, मधुमेह, कर्करोग आदी तपासणी करण्यात आली व आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली.
या शिबीराकरिता मोठया संख्येने उपस्थित राहीलेल्या महिलांची आरोग्य तपासणी करून रक्त तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये 2162 महिलांच्या आरोग्य तपासणी व रक्त तपासणी अंती 106 महिलांना रक्तदाब असल्याचे व 88 महिलांना मधुमेहाचे प्राथमिक निदान आढळून आले आहे. सदर निदान झालेल्या महिलांना सबंधित रुग्णालये व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरून उपचार सुरू करण्यात आले असून त्यांना सदर आजारांबाबत माहिती देण्यात येऊन नियमितपणे आरोग्य तपासणी व रक्त तपासणी करणेबाबत सूचित करण्यात आले आहे.
उपस्थित एकूण 2162 महिलांमध्ये Oral Cancer, Breast Cancer व Cervix Cancer ची तपासणी केली असता त्यामध्ये एका महिलेला Breast Cancer चे निदान झाले असून या महिलेला पुढील उपचाराकरीता संदर्भित करण्यात आले आहे. तसेच उर्वरित सर्व महिलांना कर्करोगाविषयी माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.
या शिबीरांमध्ये असांसर्गिक रोगांबद्दल जनजागृती करून रक्तदाब, मधुमेह, कर्करोगाची लक्षणे आढळल्यास नजिकची महानगरपालिका रुग्णालये व ना.प्रा.आ.केंद्रामध्ये तपासणी करून घेण्याचे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.