नमुना तपासणी नाकारणाऱ्या प्रयोगशाळेची चौकशी आणि कारवाई होणार
पनवेल (पनवेल) वडखळ येथील अंगणवाडी केंद्रात शालेय पोषण आहारात मृत उंदीर आढळून आल्याबाबत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल झाला होता. या प्रश्नाच्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात उपप्रश्न उपस्थित केला. त्यामध्ये प्रयोगशाळेने नमुना तपासणीसाठी का नकार दिला असा सवाल उपस्थित करून दोन्ही प्रयोगशाळांची चौकशी आणि कारवाई करण्याची आग्रही मागणी केली.
रायगड जिल्ह्यातील वडखळ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी क्रमांक ३ मध्ये बालकांसाठी घरपोच वाटप करण्यात येणाऱ्या मल्टीमिक्स सिरीयल्स अॅण्ड प्रोटीन या पोषण आहाराच्या पाकिटमध्ये मृत उंदीर आढळून आला असल्याचे जानेवारी २०२५ निदर्शनास आले. त्यामुळे या प्रकरणी शासनाने चौकशी करुन भविष्यात अशा घटनांना आळा घालणेसह यास जबाबदार पोषण आहार पुरवठा कंपनी विरोधात कारवाई करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्न दाखल झाला होता. त्या प्रश्नावर सभागृहात चर्चा झाली.
या प्रश्नावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या उत्तरात सांगितले कि, वडखळ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी क्रमांक ३ मध्ये बालकांसाठी घरपोच वाटप करण्यात येणाऱ्या मल्टीमिक्स सिरीयल्स अॅण्ड प्रोटीन या पोषण आहाराच्या पाकिटमध्ये मृत उंदीर आढळून आल्याची बाब अंशतः खरी आहे. अंगणवाडी सेविका यांना घरपोच आहार वाटप करताना मल्टीमिक्स सिरीयल्स अँड प्रोटीनचे एक पाकीट कडक लागल्याने सदर पाकीट अंगणवाडी केंद्रामध्ये उघडण्यात आले. त्यावेळी बाल विकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका यांनी तात्काळ तेथे भेट दिली. सदर पाकीट उघडून पाहिले असता त्यामध्ये मृत अवस्थेत प्राणी सदृश अवशेष आढळून आले. त्यामुळे पुढील आहार वाटप तात्काळ थांबवण्यात आला. तसेच, ज्या लाभार्थ्यांना आहार वाटप केला होता त्यांचा आहार अंगणवाडी सेविकेमार्फत अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करुन घेण्यात आला. जमा करुन घेण्यात आलेल्या आहारापैकी आहाराचा नमुना सरपंच, सदस्य व ग्रामस्थांसमोर पंचनामा करुन हडपसर-पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीकरता पाठविण्यात आला होता. सदर अहवालानुसार घरपोच आहार खाण्यास योग्य आहे. तसेच संशयास्पद मृत अवस्थेत प्राणी सदृश अवशेष असलेल्या आहाराचे पाकीट देखील तपासणीसाठी हडपसर-पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. परंतु, सदर प्रयोगशाळेने सदरचा नमुना तपासणीसाठी स्विकारला नाही. त्यामुळे दिनांक २९ जानेवारी २०२५ रोजी न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई येथे सदर नमुना तपासणीकरता पाठविण्यात आला, परंतु त्या ठिकाणी देखील आहार नमुना तपासणीसाठी स्विकारला नाही. वडखळ ग्रामपंचायत अंतर्गत सर्व अंगणवाडी केंद्रातील वाटप झालेला घरपोच आहार ताब्यात घेवून पुन्हा नव्याने घरपोच आहाराचा पुरवठा करण्यात आलेला आहे. संबंधित पुरवठाधारकास सदर पुरवठ्याबाबत खुलासा सादर करण्याबाबत कळविण्यात आलेले होते. त्यानुसार संबंधित पुरवठाधारकाचा खुलासा प्राप्त झालेला आहे. सदर खुलाशानुसार घरपोच आहार हा मानवी हस्तक्षेप विरहीत मशीनद्वारे तयार केला जातो. तसेच, सदर माल तयार झाल्यानंतर तो माल अंगणवाडीपर्यंत पोहचण्यासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी लागतो. सदर माल फॅक्टरीतून अंगणवाडी पर्यंत पोहचण्याच्या कालावधीवरून पाकीटामध्ये आढळून आलेला प्राणी सदृश अवशेष कोरडया स्वरूपात आढळून यायला पाहिजे होता. परंतू पाकीटामधील प्राण्याचे अवशेष ओल्या स्वरूपात असून तो एक ते दोन दिवसांपूर्वीच मृत झाला असावा असे वाटत आहे. तसेच फुल्ली ऑटोमॅटीक मशिनद्वारे घरपोच आहार तयार झाल्यामुळे पाकीटामध्ये उंदीर किंवा त्यासदृश दिसणाऱ्या वस्तूचे अस्तित्व राहणे शक्य नाही, असे पुरवठाधारकाने खुलास्यात म्हंटले आहे.
या उत्तरावर सभागृहात बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपप्रश्न मांडला. हडपसर-पुणे प्रयोगशाळा आणि न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई या सदर नमुना तपासणीकरता पाठविण्यात आला, परंतु या दोन्ही लॅबने आहार नमुना तपासणीसाठी का नाकारला हे कळले पाहिजे. ज्या शस्त्राने हत्या झाली ते शस्त्र सोडून बाकी शस्त्र तपासून झाले अशी गत या प्रकरणात झाली आहे त्यामुळे तपासणी नाकारणाऱ्या लॅबची चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उप्रश्नातून केली. या दोन्ही प्रयोगशाळेने सदरचा नमुना तपासणीसाठी का स्विकारला नाही याची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन केली जाईल असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगून त्यानुसार कारवाई करण्याचे आश्वासन सभागृहात दिले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पोषण आहाराच्या ठेकेबाबत सूचना करताना लहान मुलांना हे पोषण आहार दिले जात असल्याने यामध्ये ब्रँडेड अशा कंपनीकडून पोषण आहार घेतले पाहिजे अशी सूचना केली. जेणे करून ब्रँडेड कंपनी स्वतःचे अस्तित्व लक्षात घेऊन दर्जेदार आहाराचा पुरवठा करू शकेल. यावर नामदार आदिती तटकरे यांनी शासनाचे नियम व निकष पाळून या कामी ठेका दिला जात असल्याचे सांगितले पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सूचित केल्याप्रमाणे या संदर्भातील उच्चस्तरीय समितीकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचे आश्वासित केले.