सावित्रीची लेक,डॉक्टर कु.साक्षी प्रवीण कदम रशियातून MBBS चे शिक्षण पूर्ण करून मायदेशी परतल्या
खारघर/प्रतिनिधी,दिनांक-२३
खारघर मधील सुपरिचित व्यक्तीमत्त्व आणि चळवळीतील उच्च विद्याविभूषित कार्यकर्ते तसेच सेक्टर-१५ स्थित घरकुल हौसिंग कॉम्प्लेक्समधील महालक्ष्मी हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीण कदम यांची जेष्ठ सुपुत्री डॉक्टर कुमारी साक्षी प्रवीण कदम या नुकत्याच रशियातून आपले M B B S चे शिक्षण पूर्ण करून मायदेशी परतल्या.
परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण मायदेशातून पूर्ण करण्यासाठी NExT ही प्रवेश परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे लागते,ती परीक्षा सुद्धा डॉक्टर साक्षी या उत्तीर्ण झाल्या आहेत.
त्या वैद्यकीय शिक्षणासाठी रशियात दाखल झाल्या त्यावेळी कोरोना या महामारीने संपूर्ण जगात मृत्यूचे थैमान घातले होते.प्रत्येक जण मृत्यूच्या छायेत जगत असताना त्यांनी आपल्या शिक्षणाला सुरूवात केली.ते संपते तोच रशिया-आर्मेनिया युद्ध सुरू झाले.त्यानंतर दोन वर्षांपासून सुरू असलेले युक्रेन युद्ध.या काळात युद्धजन्य रशियात डॉक्टर साक्षी यांच्या होस्टेल आणि कॉलेजच्या परिसरात अनेक वेळा बॉंब वर्षाव झाल्याचे त्यांनी "जनसभा"च्या प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले.अशा असणे आणि नसण्याच्या गंभीर परिस्थितीत अनेक परदेशी विद्यार्थी आपले शिक्षण अर्धवट सोडून मायदेशी परतले;पण कुमारी साक्षी यांनी परिस्थितीपुढे नमते न घेता आपले वडील प्रवीण कदम यांनी आपल्या आयुष्याची कमाई माझ्या परदेशी शिक्षणासाठी खर्च केल्याची जाणीव ठेवून या खडतर परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले.डॉक्टर साक्षी यांचे हे शिक्षण कोणत्याही कोट्यातील आरक्षणाशिवाय आणि स्कॉलरशिप-फेलोशिपशिवाय स्वत:च्या गुणवत्तेवर आणि वडीलांच्या उत्पन्नावर पूर्ण केले आहे.
आजच्या तरुण पिढीने डॉक्टर साक्षी यांच्या या अभ्यासूपणाच्या आणि संघर्षाच्या वारशाचा योग्य आदर्श घेऊन वाटचाल करावी आणि आपल्याबरोबर च समाजाचे,देशाचे आणि मानवजातीचे जीवनमान व राहणीमान उंचावण्यासाठी योगदान द्यावे.
यावेळी डॉक्टर साक्षी यांच्या आगमनाप्रित्यर्थ सन्माननीय प्रवीण कदम यांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते.याप्रसंगी प्रवीण कदम यांचे वडील आणि डॉक्टर साक्षीचे आजोबा सन्माननीय तुकाराम कदम हे सुद्धा उपस्थित होते.त्यांनीच ५० वर्षापूर्वी,माझ्या कुटुंबातील कोणा एकाला डॉक्टर बनविण्याचे स्वप्न पाहिले होते.
या स्नेह भोजनाला कदम कुटुंबातील सदस्याबरोबरच मित्र परिवार,विविध सोसायट्यांचे पदाधिकारी,समाजिक संस्थांचे मान्यवर,मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.