महाकुंभमेळ्यात रायगडच्या पितापुत्रांची गायनसेवा

 महाकुंभमेळ्यात रायगडच्या पितापुत्रांची गायनसेवा 


पनवेल (प्रतिनिधी) ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात रिंगण, टाळ-मृदंगाच्या गजरातील दिंडी सोहळा... कीर्तनातून हरिजागर... अन् ज्ञानेश्वरी पारायणाचा उ‌द्घोष... अशा भक्तिमय वातावरणात प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात ज्ञानेश्वरी भव्य सामुदायिक पारायण आणि अखंड हरिनाम महोत्सव मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. या महोत्सवात रायगड जिल्ह्याचे सुपुत्र हरी भक्त पारायण भजनसम्राट निवृत्तीबुवा चौधरी आणि त्याचे चिरंजीव पंडित उमेश चौधरी यांनी बालयोगी सदानंदबाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत संगीत सेवा दिली.  यावेळी हरिनामाच्या गजराने प्रयागराज येथील त्रिवेणी संगमाला जणू चंद्रभागेचे रूप आले होते.
         कुंभमेळ्याचे औचित्य साधून तुंगारेश्वर येथील बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रमाच्या वतीने हिंदी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित केला होता. प्रयागराज येथील सेक्टर नऊमध्ये झालेल्या या सप्ताहात काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, कथा, भजन तसेच कीर्तने झाली. ज्ञानेश्वरी पारायणास अडीच हजार भाविक बसले होते. या महोत्सवात सुप्रसिद्ध भजनसम्राट निवृत्तीबुवा चौधरी आणि त्यांचे चिरंजीव पं. उमेश चौधरी यांनी भजन सादर करत वातावरण भक्तिमय केले होते. त्यांना पखवाजवर निलेश पाटील तर गायन साथ नारायणबुवा पाटील व गोपीनाथ महाराज यांनी साथ दिली. 
या सप्ताहात सप्ताहात योगीराज महाराज गोसावी, विश्वनाथ महाराज वारिंगे, विजय महाराज जगताप, प्रल्हाद महाराज शास्त्री, राजेंद्र महाराज दहिभाते, जगन्नाथ महाराज पाटील, सर्वेश्रीताई महाराज यांची कीर्तने झाली. तुकाराम महाराज शास्त्री यांच्या काल्याचे कीर्तन झाले. तुकाराम महाराज शास्त्री यांनी रामकथेवर निरूपण केले. बालयोगी श्री सदानंद महाराजांच्या भक्तांनी ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करीत दिंडी सोहळा काढला. या वेळी उपस्थित भाविकांनी डोक्यावर ज्ञानेश्वरी घेऊन ज्ञानोबा-तुकारामांचा गजर करीत रिंगण घातले.यावेळी वारकरी सांप्रदायिक गजराने त्रिवेणी संगमाचा परिसर दणाणून गेला.