शिवजयंती उत्साहात साजरी;भव्य दिव्य मिरवणुकीने दुमदुमली पनवेल नगरी
पनवेल,दि.19 : "छत्रपती शिवाजी महाराज की जय" अशा जयघोषात, ढोल- ताशा आणि लेझीमच्या गजरात आज पनवेल नगरी दुमदुमली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंती निमित्ताने पनवेल महानगरपालिका व लोकसहभागातून भव्य - दिव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त मंगेश चितळे,तसेच माजी महापौर डॉ. कविता चौतमोल,माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सकाळी 7.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती अश्वारूढ पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व महाराष्ट्र गीताच्या सादरीकरणा नंतर ढोल ताशाच्या गजरात भव्य - दिव्य अशा मिरवणूकीची सुरूवात झाली. या मिरवणूकीमध्ये पारंपारीक वेशभुषेमधील महिला , विद्यार्थी व विद्यार्थांनी, छ.शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रांतील विविध प्रसंगाचे चार शाळांचे चित्ररथ, महापालिकेच्या शाळां व सेंट जोसेफ शाळा, के. वी कन्या प्रशाला , महात्मा इंटरनॅशनल स्कूल, आगरी शिक्षण संस्था शाळा, सीकेटी शाळा, रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम शाळा अशा विविध शाळांच्या विद्यार्थ्यांचे 13 लेझिम पथक ,ढोल पथक, बॅन्जो पथक याचा समावेश होता.
छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळ्याजवळून निघालेली ही मिरवणूक– हुतात्मा स्मारक चौक – आदर्श लॉज – लाईन आळी – लोकनेते दि.बा.पाटील प्राथमिक शाळा – गावदेवी मंदिर – स्वा. सावरकर चौक – बापटवाडा चौक – महानगरपालिका कार्यालय – सेवा योजन कार्यालय – बंदर रोड चौक – मौलाना आझाद चौक या मार्गाने निघून छत्रपती शिवाजी महाराज अर्धाकृती पुतळा टपाल नाका येथे आली. येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या मिरवणूकीची सांगता झाली.
*छत्रपतींचा जयघोष*
यानंतर पुढील कार्यक्रमांसाठी मिरवणूकीतील सहभागी स्पर्धक ,नागरिक व महापालिका अधिकारी व कर्मचारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात एकत्रित येताच छ.शिवाजी महारांजाच्या जय घोषाने अवघे नाट्यगृह दुमदुमले. अशा भारलेल्या वातावरणामध्ये गणेश ताम्हाणे व सहकारी यांनी आपल्या पहाडी आवाजात सादर केलेल्या पोवाड्यांनी सर्वांच्या अंगावर शहारे आले.
*आमदार प्रशांत ठाकूर*
यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वाभिमानाने जगायला शिकवले आहे. महाराजांनी पेटवलेली स्वराज्याची ज्योत मावळ्यांमध्ये पेटत राहिली. तीच ज्योत आपल्या सर्वांमध्ये पेटत राहिली पाहिजे.
तसेच त्यांनी आजवरची सर्वात मोठी, भव्य मिरवणूक अशा शब्दात त्यांनी आज निघालेल्या मिरवणूकीचे कौतुक केले.
मान्यवरांच्या शुभहस्ते मिरवणूकीत सादरीकरणात विजेते ठरलेल्या लेझीम पथकांना व चित्ररथांना पारितोषिके देण्यात आली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपायुक्त कैलास गावडे यांनी केले.
या सर्व कार्यक्रमास उपायुक्त सर्वश्री डॉ.वैभव विधाते, प्रसेनजित कारलेकर, रविकिरण घोडके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे, सहायक संचालक नगररचना केशव शिंदे, शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे ,लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण,सहाय्यक आयुक्त सर्वश्री श्रीराम पवार, श्रीमती स्मिता काळे, डॉ.रूपाली माने, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर , सामान्य प्रशासन विभाग प्रमुख दशरथ भंडारी, माजी नगरसेवक, नगरसेविका , कर्मचारी, महापालिका व इतर शाळांचे शिक्षक व विद्यार्थी पनवेल शहरातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
मिरवणुकीतील बक्षीस विजेते
चित्ररथ
प्रथम पारितोषिक - आगरी शिक्षण संस्था खांदा कॉलनी
द्वितीय पारितोषिक - पनवेल महानगर पालिका शिक्षण विभाग
तृतीय पारितोषिक -लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्रजी माध्यम शाळा कामोठे
लेझीम
प्रथम पारितोषिक - के. वी. कन्या विद्यालय, पनवेल
द्वितीय पारितोषिक -सेंट जोसेफ स्कूल सीबीएससी
तृतीय पारितोषिक - महात्मा इंटरनैशनल स्कूल
चौकट
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने पनवेल महापालिकेच्या माध्यमातून व लोकसहभागातून निघालेल्या भव्य मिरवणूकीमध्ये पनवेल शहरातील विविध चौकांमध्ये सामाजिक मंडळांनी मिरवणूकीमध्ये सहभागी झालेल्यांना पाणी, खाद्यपदार्थ, ज्यूस, ताक यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.