पनवेल महानगरपालिकेच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा


पनवेल महानगरपालिकेच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा



पनवेल,दि.27 : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठीतील प्रसिद्ध कवी, नाटककार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस  म्हणजे मराठी भाषा गौरव दिन निमित्ताने पनवेल महानगरपालिकेच्यावतीने प्रा. विसूभाऊ बापट यांच्या 'कुटुंब रंगलय काव्यात' या कार्यक्रमाचे आयोजन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. तसेच यावेळी माझी वसुंधरा अंतर्गत पर्यावरणपूरक गणपती उत्सव स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर तसेच आमदार विक्रांत पाटील, उपायुक्त सर्वश्री कैलास गावडे, डॉ. वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त डॉ. रूपाली माने उपस्थित होते.आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. 

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, कवी कुसूमाग्रजांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून महाराष्ट्राचे नाव भारतभर पसरविले, त्यांच्या कवितेतून स्फुर्ती घेऊन आपण पुढे पाऊल टाकत राहू. पनवेल महापालिकेला माझी वसुंधरा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला, हा गौरव मिळवून देण्यांसाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचा महापालिका सन्मान करते आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. पनवेल शहराला अधिक सुंदर बनविण्यामध्ये या सर्वांचा हातभार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पनवेल महापालिकेच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यांतर्गत घेण्यात आलेल्या काव्य वाचन स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच माझी वसुंधरा अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा अंतर्गत वैयक्तिक स्तरावरील दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस गणेश उत्सव विजेते व दहा दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवामधील विजेत्या मंडळांना यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. 

तसेच महापालिकेच्यावतीने गणेशोत्सवांदरम्यान कृत्रिम तलावामध्ये गणेश विसर्जन उपक्रमासाठी ज्या ज्या शाळांनी, महाविद्यालयांनी सहकार्य केले त्या  शाळांचा, महाविद्यालयांचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी महापालिकेचे  शहर अभियंता संजय कटेकर,प्रभाग अधिकारी, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर, सामान्य प्रशासन विभाग प्रमुख दशरथ भंडारी, पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण, नाट्यगृह विभाग प्रमुख राजेशडोंगरे,  बक्षीस विजेते गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी, विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक,एनजीओ प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी नगरसचिव अक्षय कदम यांच्या हस्ते विसुभाऊ बापट यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच  ओमप्रकाश साळस्कर यांनी तबल्यावर उत्तम साथ दिली. त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त कैलास गावडे व आभार डॉ. राजू पाटोदकर यांनी केले. 

चौकट

प्रा. विसूभाऊ बापट यांचा 'कुटुंब रंगलय काव्यात'कार्यक्रमाला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद

 यावेळी सादर झालेल्या प्रा. विसूभाऊ बापट यांच्या 'कुटुंब रंगलय काव्यात' या कार्यक्रमाला श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. कवितेमधील विविध भावनांचे सादरीकरण यावेळी त्यांनी केले. यामध्ये ‘ बाप्पा तुम्ही याहो खूप खूप दिवस रहायला’ अशा बालकवितांपासून ते तरूणाईला भुरळ घालणाऱ्या मंगेश पाडगावकरांच्या ‘ त्याने प्रेम केले , तुमचे काय गेले’ अशा अनेक कविता सादर केल्या. तसेच शायर भाऊसाहेब पाटणकरांच्या ‘ सांगेन काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे, तो कविचा मान तितुकी पायरी माझी नव्हे’ अशा शायरी पासून ते चारोळ्या पर्यंत कवितेच्या अनेक नानाविविध प्रकारांचे प्राध्यापक विसूभाऊ बापट यांनी सादरी करण केले. महाराष्ट्रातील सुप्रसिध्द कवी बरोबरच अपरिचित कविंच्या कविता सादर करताना कवितेमागील अनेक किस्से, आठवणी यावेळी त्यांनी सांगितले.