छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रेचे आयोजन
केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालय, युवा कार्यक्रम विभागाचे सचिव यांचेकडील प्राप्त पत्राच्या अनुषंगाने दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती साजरी करणेबाबत नियोजन करण्यात आलेले आहे.
या निमित्ताने महाराष्ट्रातील 36 जिल्हयांमध्ये ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रा राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून या उपक्रमांतर्गत 04 ते 06 किलोमीटर इतक्या अंतराची पदयात्रा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. पदयात्रेच्या अनुषंगाने नवी मुंबई शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था यांच्याशी समन्वय साधण्यात आलेला असून शासन निर्देशानुसार पदयात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.
नवी मुंबई शहरामध्ये दोन ठिकाणी (1) वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि (2) नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करणेकरिता पदयात्रा व सांस्कृतिक कार्यक्रम यांचे नियोजन करण्यात आले आहे.
वाशी येथील पदयात्रेमध्ये 1500 हून अधिक विद्यार्थी (कोपरी ते सेंट लॉरेन्स हायस्कूल, सेंट लॉरेन्स हायस्कूल ते विष्णूदास भावे नाटयगृह, मॉडर्न कॉलेज ते अग्निशमन दल, जैन मंदीर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, सेक्टर-1 ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, अग्निशमन दल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुहूगांव ते छत्रपती शिवाजी महाराज चौक) तसेच नमुंमपा मुख्यालय येथे 500 हून अधिक विद्यार्थी (बेलापूर गाव ते मुख्यालय, दिवाळे गाव ते मुख्यालय, विद्याभवन हायस्कूल नेरुळ ते मुख्यालय, आग्रोळी गाव ते मुख्यालय) अशाप्रकारे पदयात्रेत सहभागी होणार आहेत. यामध्ये शिक्षक व शिवप्रेमी नागरिक यांचाही समावेश असणार आहे. नमुंमपा मुख्यालयातील ॲम्फीथिएटर येथे मा. प्रधानमंत्री यांच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (Live Telecast) आयोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर पोवाडा, भाषण, नृत्यगीत सादर करण्यात येणार आहेत. नवी मुंबई महानरगपालिकेतील अधिकारी/कर्मचारी देखील या पदयात्रेत सहभागी होणार आहेत.