महापालिकेच्यावतीने मालमत्ता कर थकविणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाईस सुरूवात

महापालिकेच्यावतीने मालमत्ता कर थकविणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाईस सुरूवात

पनवेल,दि.17: महानगरपालिकेचा मालमत्ता कर न भरणाऱ्या आस्थापना विरोधात कडक कारवाई करण्यास पनवेल महानगरपालिकेने सुरूवात केली आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनूसार मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांना जप्तीपुर्व नोटीसा व वॉरंट बजावण्यास पालिकेने सुरूवात केली आहे. तसेच जप्ती कारवाईस देखील सुरवात करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. ज्या आस्थापनांचा मालमत्ता कर अधिक भरणे आहे, अशा आस्थापना पालिकेच्या रडारवरती असून येत्या काही दिवसांमध्ये अशा आस्थापनांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.

महानगरपालिका क्षेत्रात चारही प्रभागामधील सुमारे ३ लाख ५० हजार मालमत्तांना कर आकारणी करण्यात आली आहे. यामधील ज्या आस्थापनांचा अधिक  मालमत्ता कर  देणे बाकी आहे अशा आस्थपनांना मालमत्ता कर विभागाच्या जप्ती पथकाच्या कर्मचारी जप्ती पूर्व नोटीसा व वॉरंट बजावत आहेत. या पथकांनी  आजपर्यंत चारही प्रभागामध्ये एकुण 447 जप्तीपूर्व नोटीसांचे वाटप केले असून 27 वॉरंट बजावण्यात आले आहेत. यामध्ये नुकतीच तळोजा येथील मे .वॉलरेक मॉड्यूलर सिस्टक कंपनीवरती जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

 सध्याच्या आर्थिक वर्षामध्ये  एप्रिल महिन्यापासून आजपर्यंत 326 कोटी इतकी वसुली झाली आहे.मालमत्ता कर हा महापालिकेचा एकमेव आर्थिक स्त्रोत असल्याकारणाने  मालमत्ता कर उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख, जप्ती पथकामधील अधिकारी , कर्मचारी  यांना सुट्टी न घेता काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  पथक अधिकाऱ्यांना त्यांच्या अधीनस्त असलेल्या सर्व मालमत्ताधारकांना प्रवृत्त करुन लवकरात लवकर महानगरपालिकेस मालमत्ता कराचा भरणा करून महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन  केले  जात आहे . मालमत्ता कराचा भरणा न केल्यास जप्ती व अटकावणी कारवाई करण्यात येईल अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. 

 महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १२८ व अनुसूची ड प्रकरण ८ कराधान नियम ४७ अन्वये महानगरपालिकेस देय असलेल्या कराच्या थकबाकी पोटी जंगम स्थावर मालमत्ता जप्त अथवा अटकावणी करुन जाहिर लिलावाने विक्री करून थकबाकी वसूल करणेची तरतूद महानगरपालिकेस आहे. त्यानूसार नोटीस देऊनही मालमत्ता कराचा भरणा न केलेल्या थकबाकीदारांना उपायुक्तांच्या सूचनेनूसार , कर अधीक्षक महेश गायकवाड व करअधीक्षक सुनिल भोईर यांच्या जप्ती पथकामार्फत खारघर,उपविभाग नावडे, कळंबोली कामोठे,पनवेल व नविन पनवेल प्रभागामधील थकबाकीदारांना जप्ती व अटकावणीची कारवाई करण्यात येत आहेत.

महापालिकेच्या सर्व प्रस्तावित कामांसाठी मालमत्ता कर हा प्रमुख स्त्रोत आहे.  मालमत्ता कर न भरल्यास त्याच्या शास्तीमध्ये प्रतिमहा २ टक्क्यांची वाढ होत असल्याने नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. महापालिकने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेचwww. panvelmc.org या वेबसाईटवरती जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. मालमत्ताधारकांना काही शंका असल्यास  1800-5320-340   या टोल फ्री क्रमांवरती संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.