नवी मुंबई महानगरपालिकेस लोकाभिमुख डिजीटल सेवेचा ‘स्मार्ट गव्हर्नन्स’ पुरस्कार
*श्री अधिकारी ब्रदर्सच्या गव्हर्नन्स नाऊ प्रकाशनाच्या वतीने आयोजित ‘वेस्ट टेक सिम्पोजियम’ मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस स्मार्ट गव्हर्नन्स क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘स्मार्ट गव्हर्नन्स पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांनी हा पुरस्कार सिने निर्मात्या श्रीम. कांचन अधिकारी व सिने अभिनेते श्री.महेश ठाकूर यांच्या हस्ते मुंबईतील विशेष समारंभात स्विकारला. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार उपस्थित होते.*
शहरी पायाभूत सुविधा पुरविताना पर्यावरणाची काळजी घेऊन शाश्वत विकास साधला जावा ही संकल्पना नजरेसमोर ठेवून आयोजित या ‘वेस्ट टेक सिम्पोजियम’ मध्ये ई-गव्हर्नन्स क्षेत्रामध्ये काम करणा-या कंपन्या, तंत्रज्ञान क्षेत्रात अभिनव काम करणा-या कंपन्या तसेच महानगरपालिकेशी निगडीत तांत्रिक सेवा पुरविणा-या संस्था त्याचप्रमाणे गुजराथ, गोवा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल अशा विविध राज्याxतील महानगरपालिका व इतर शासकीय संस्था सहभागी झाल्या होत्या.
*नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी प्रशासनात केलेला डिजीटल माध्यमांचा प्रभावी वापर व त्यामुळे सार्वजनिक सेवा वितरण करताना कार्यक्षमतेत झालेली वाढ, कामकाजात वृध्दिंगत झालेली पारदर्शकता व नागरिकांना मोठ्या प्रमाणात झालेला प्रत्यक्ष लाभ अशा विविध बाबींचा विचार करून नवी मुंबई महानगरपालिकेस ‘स्मार्ट गव्हर्नन्स पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
तंत्रज्ञानाचा कामकाजात प्रभावी उपयोग करून त्याचा लाभ नागरिकांना मोठ्या प्रमाणात व्हावा असा दृष्टिकोन जपणा-या आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेने दैनंदिन कामकाजात ई ऑफिस प्रणालीचा प्रभावी उपयोग सुरू केला असून त्यामुळे कामकाजात सुलभता आली आहे व पारदर्शकता आणि गतीमानता वाढली आहे. तसेच कागदांचा मोठ्या प्रमाणावर होणारा उपयोग कमी झाल्याने पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनेही ही मोठी बाब आहे. ई-ऑफिस प्रणालीमुळे माहितीची सुरक्षा वाढली असून माहितीची उपलब्धता जलद होत आहे. यामुळे नागरिकांना अधिक चांगल्या सेवा गतीमानतेने देता येणे शक्य होत आहे.
याप्रमाणेच इंटरप्राइज रिसोर्स प्लॅनींग (ERP) प्रणाली यशस्वीरित्या अंमलात आणण्यात येत असून याव्दारे सर्व कार्यवाहीची इंटरकनेक्टिव्हिटी सुनिश्चित होणार आहे तसेच युनिफाईड डॅशबोर्डव्दारे महानगरपालिकेतील सर्व विभागांच्या कार्याचे सर्वसमावेशक निरीक्षण करणे सुलभ होणार आहे.
महानगरपालिकेमार्फत नागरिकांना पुरविण्यात येणा-या विविध प्रकारच्या लोकसेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या असून सद्यस्थितीत जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी, पाणीपुरवठा, मालमत्ताकर विषयक विविध बाबी अशा 90 सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या असून आणखी 15 सेवा विकासाधीन आहेत.
त्यासोबतच नागरिकांना महानगरपालिकेशी संबंधित कोणत्याही कामाविषयी तक्रार / सूचना करावायाची झाल्यास त्यांच्याकरिता तक्रार निवारण प्रणाली (grievance redressal System) कार्यान्वित करण्यात आली असून नागरिक महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर किंवा आपल्या हातातील मोबाईमधील ॲपवरूनही तक्रार दाखल करू शकतात व त्यांच्या तक्रार निराकरणाची सद्यस्थिती जाणून घेऊ शकतात. याव्दारे महानगरपालिका अधिक संवादी झाली असून नागरिकांकडूनही या प्रतिसादात्मक प्रणालीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
संकेतस्थळ हा महानगरपालिकेचा चेहरा असून याव्दारे नागरिकांना विविध माहिती मिळते तसेच विविध सेवांच्या जलद उपलब्धतेसाठी डिजीटल माध्यमाव्दारे गतीमानता येते. यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या माहितीने परिपूर्ण अशा अधिकृत संकेतस्थळाचे अद्ययावतीकरण व नुतनीकरण करण्यात आले आहे. हे संकेतस्थळ आता अधिक आकर्षक व माहितीने परिपूर्ण करण्यात आले आहे. या माध्यमातून नागरिकांना उत्तम दर्जाच्या सेवा व माहिती पुरविण्यासोबतच नागरिकांशी सुसंवादही वाढत आहे.
सध्याच्या सोशल मिडीयाप्रेमी युगात मोबाईलचा वापर लक्षणीयरित्या वाढला असून मोबाईल मधील विविध ॲपव्दारे आपल्याला आवश्यक माहिती उपलब्ध करुन घेणे तसेच विविध प्रकारची देयके अदा करणे, एखाद्या सुविधेविषयी तक्रार करणे अथवा सूचना करणे आदी कार्यवाही नागरिकांमार्फत होत असते. यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने ‘माझी नवी मुंबई – My NMMC – माझी नवी मुंबई’ ॲप विकसित केले असून याव्दारे नागरिक आता हातातील मोबाईलवर महानगरपालिकेविषयी माहिती मिळवू शकतात, देयक भरणा करू शकतात, सूचना करू शकतात अथवा तक्रारही दाखल करू शकतात.
*अशा लोकहिताय सर्व बाबींचा विचार करून हा ‘स्मार्ट गव्हर्नन्स पुरस्कार’ नवी मुंबई महानगरपालिकेस प्रदान करण्यात आला असून यामुळे महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. नवी मुंबईकर नागरिकांची महानगरपालिकेशी संबंधित कामे तसेच आवश्यक लोकसेवा त्यांना महानगरपालिकेच्या कोणत्याही कार्यालयात जावे न लागता घरच्या घरी ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका कटिबध्द असून नागरिकांनी या डिजीटल माध्यमांचा जास्तीत जास्त उपयोग करावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.*