मराठी भाषा संवर्धनासाठी दैनंदिन जीवनात प्राधान्याने मराठीचाच वापर करावा – अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार

 मराठी भाषा संवर्धनासाठी दैनंदिन जीवनात प्राधान्याने मराठीचाच वापर करावा – अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार

 

पुस्तक वाचनामुळे जग कळते आणि आपल्या विचारांना दिशा मिळते तसेच योग्य मार्गाने चालण्याची ऊर्जा मिळते, त्यामुळे आपण पुस्तके वाचत राहिली पाहिजेत असे सांगत अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी मोबाईल वाचन संस्कृतीतून बाहेर पडून आपण पुस्तक वाचन संस्कृतीकडे वळायला पाहिजे अशा शब्दात वाचनाचे महत्व अधोरेखीत केले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामधील अधिकारी, कर्मचारीवृंदांच्या अंगभूत प्रतिभेला वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या स्वकवितावाचन, चरित्र-आत्मचरित्र अभिवाचन आणि वक्तृत्व स्पर्धा अशा 3 स्पर्धांच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांनी उपस्थितांशी दिलखुलास संवाद साधला.

मराठी भाषेची जाण आणि जाणीव मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यापुरती मर्यादीत न ठेवता आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या मायबोली मराठीचाच प्राधान्याने वापर करायला हवा हे त्यांनी उदाहरणे देत निग्रहपूर्वक सांगितले. जोपर्यंत चंद्र – सूर्य आहेत तोपर्यंत मराठी भाषा राहील, मात्र ती सर्वोत्त्म स्थानी असावी यासाठी आपण तिचा जास्तीत जास्त वापर करायला हवा असे मत व्यक्त केले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कालावधीतच उत्तम लिखाणातून मराठी भाषेच्या विकासासाठी अथक कार्यरत असणारे नवी मुंबईचे नागरिक जगप्रसिध्द सुलेखनकार श्री. अच्युत पालव यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर होणे ही आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट असल्याचेही ते म्हणाले. याप्रसंगी परिमंडळ 2 उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, भांडार विभाग उपआयुक्त श्री. शंकर खाडे उपस्थित होते.    

मान्यवरांच्या शुभहस्ते तिन्ही स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, व्दितीय, तृतीय व पाच उत्तेजनार्थ अशी प्रत्येकी आठ पारितोषिके प्रदान करण्यात आली. विशेष म्हणजे पारितोषिके ही त्या त्या स्पर्धेला साजेशी ग्रंथ स्वरुपात देण्यात आली.

‘स्वकाव्यवाचन’ स्पर्धेत पुष्पांजली कर्वे, नारायण लांडगे व डॉ. कैलास गायकवाड यांना अनुक्रमे तीन क्रमांकाची तसेच चित्रा बाविस्कर, निता दुबे, डॉ. गजानन मिटके, दिपक बडगुजर, ज्योती मिसाळ यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण कवी श्री. अशोक गुप्ते यांनी केले होते.

‘चरित्र – अत्मचरित्र अभिवाचन’ स्पर्धेत भारती वाव्हळे, डॉ. कैलास गायकवाड व नीता दुबे यांनी अनुक्रमे तीन क्रमांकाची तसेच पुष्पांजली कर्वे, अभय जाधव, सुनिता दौंडकर, सानिका शेट्ये, सुनिल गावित यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावली. नाटय, चित्रपट अभिनेते श्री. अशोक पालवे यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले होते.

‘अभिजात मराठीची पुढील वाटचाल’ या विषयावर आयोजित वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण व्याख्याते प्रा. रवींद्र पाटील यांनी केले होते. त्यामध्ये श्री. नारायण लांडगे, डॉ. कैलास गायकवाड, चित्रा बाविस्कर यांनी अनुक्रमे तीन क्रमांकाची पारितोषिके तसेच अभय जाधव, नीता दुबे, लवेश पाटील, दिपक बडगुजर, मधुकर वारभुवन यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके संपादित केली.

 

मराठी भाषेस अभिजात दर्जा लाभल्याने आपली जबाबदारी वाढली असल्याचे प्रा. रवींद्र पाटील यांचे मत

 

पंधरवड्याच्या सांगता दिनी ‘अभिजात मराठीची पुढील वाटचाल’ या विषयावर ‘वक्तृत्व’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 18 स्पर्धकांनी सहभागी होत अभिजात मराठीची पुढील दिशा यावर वैविध्यपूर्ण विचार मांडले.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून उपस्थित शिवव्याख्याते व प्राचार्य प्रा. रवींद्र पाटील यांनी स्पर्धेनंतर सहभागी स्पर्धकांशी हितगुज साधतांना अभिजात मराठीची वैशिष्टे कथन करीत यापुढील काळात मराठीच्या विकासासाठी आपली जबाबदारी वाढली असल्याची सांगितले. अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने केंद्र सरकारकडून उपलब्ध होणारा निधी महाराष्ट्र राज्यात व इतरही राज्यात मराठी भाषेचे अध्ययन करण्यासाठी उपलब्ध करुन दिला पाहीजे असे ते म्हणाले. ज्याप्रमाणे शिवकाळात छत्रपती शिवरायांना भेटण्यासाठी येणारे इतर भाषिक शिष्टमंडळ सोबत मराठी भाषा कळणारे त्यांच्या भाषेतील दुभाषी ठेवायचे, तशी गरज आजही भासली पाहिजे अशी प्रतिष्ठा आणि अधिष्ठान मराठी भाषेस प्राप्त होण्यासाठी आपण जास्तीत जास्त मराठीचा वापर करुन तिचा गौरव वाढवावा हवा असे मत त्यांनी मांडले.

नवी मुंबई महानगरपालिकेने केवळ शासकीय सोपस्कार करण्यापुरते मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात कार्यक्रम केले नाहीत तर मराठी भाषेचा सर्वार्थाने जागर होईल असे विविध उपक्रम आयोजित केले याबद्दल पंधरवड्यात आयोजित विविध कार्यक्रमांतील सहभागी वक्त्यांनी व सर्व स्पर्धांच्या परीक्षकांनी कौतुक केले आहे याचा विशेष उल्लेख अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांनी केला.

पंधरवड्यात अधिकारी, कर्मचारी यांच्या मराठी भाषा प्रेमाला व अंगभूत कलेला उत्तेजन देण्यासाठी तीन स्पर्धांच्या आयोजनासोबतच ‘शासकीय कामकाजात सुयोग्य मराठीचा वापर’ या विषयावर महराष्ट्र शासनाचे निवृत्त सचिव श्री. वसंत चौधरी यांचे व्याख्यान, सुप्रसिध्द साहित्यिक डॉ. महेश केळुसकर यांचा ‘मायबोली अभिजात मराठी’ या विषयावर सुसंवाद तसेच आगळावेगळा उपक्रम म्हणजे नामांकित साहित्यिक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नामवंत लेखिका डॉ. निर्मोही फडके यांनी अभिनेते श्री. योगेश केळकर व सौ. वंदना गुजरे यांच्यासह सादर केलेला ‘स्मरणखुणा’ हा विशेष उपक्रम अशा विविधांगी कार्यक्रमांतून मराठी भाषेची ऐश्वर्य संपन्नता उलगडविण्यात आली. या सर्वच उपक्रमांना महापालिका अधिकारी, कर्मचारी यांचा तसेच साहित्यरसिक नवी मुंबईकर नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला.    

 


Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image