राज्यस्तरीय 'अटल करंडक' एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शानदार सुरुवात; सिने-नाट्य क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
पनवेल (प्रतिनिधी) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ११ व्या राज्यस्तरीय 'अटल करंडक' एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला आजपासून (दि. १०) पनवेलमध्ये शानदार सुरुवात झाली.
भरघोस रक्कमेचे पारितोषिक, दर्जेदार आणि उत्कृष्ट आयोजन व आयोजन या स्पर्धेचे वैशिष्ट्ये आहे. दरवर्षी या स्पर्धेची कलाकार आणि रसिक आतुरतेने वाट पहात असतात. त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या स्पर्धेकडे लागलेले असते. नवोदित कलाकार आणि नाटय रसिकांना मोठी पर्वणी असलेल्या या अटल करंडकाच्या माध्यमातून रविवार दिनांक १२ जानेवारी पर्यंत राज्यातील उत्कृष्ट एकांकिकांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या महाअंतिम फेरीच्या उदघाटन सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव विधाते, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, स्पर्धा प्रमुख व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर, सुप्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या मोने, सुप्रसिद्ध दिग्दर्शक देवेंद्र पेम, विराजस कुलकर्णी, भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा राजेश्री वावेकर, माजी नगरसेवक राजू सोनी, अजय बहिरा, विकास घरत, विजय चिपळेकर, प्रदीप भगत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, श्यामनाथ पुंडे, अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ, गणेश जगताप, स्मिता गांधी यांच्यासह कलाकार, आणि नाट्य रसिक उपस्थित होते.
रविवार दिनांक १२ जानेवारीला सायंकाळी ०७ वाजता होणाऱ्या पारितोषिक वितरण सोहळ्यात महाअंतिम फेरीतील विजेत्या एकांकिकेला ०१ लाख रूपये आणि मानाचा 'अटल करंडक' देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार तसेच ज्येष्ठ रंगकर्मी सतीश पुळेकर यांचा "गौरव रंगभूमीचा" पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. आज (शुक्रवारी) सखा (एमएसआयएमसीसी कॉलेज पुणे), न्यूरालिंक (तोडकं मोडकं नाट्यसंस्था ठाणे ), वर्तुळ (रंगवेध थिएटर्स पनवेल), कलम ३७५ (परिवर्तन कोल्हापूर), कुक्कुर(सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेज ठाणे), क्रॅक्स इन द मिरर (कलांश थिएटर्स मुंबई), पिंडग्राम (डी. वाय. पाटील कॉलेज कोल्हापूर), गुड बाय किस (जिराफ थिएटर्स मुंबई), जुगाड लक्ष्मी (गुरुनानक खालसा कॉलेज मुंबई ) यांचे सादरीकरण होते. तर शनिवार दिनांक ११ जानेवारी रोजी पसायदान (कल्लाकर्स ठाणे), व्हाय नॉट? (आरआयटी कॉलेज इस्लामपूर), ब्रह्मपुरा (एम. डी. कॉलेज मुंबई), झिंगाट (म. ल. डहाणूकर मुंबई), सर्पसत्र (एम्पिरिकल फाउंडेशन), ऑलमोस्ट डेड (रंगप्रसंग कोल्हापूर), चिनाब से रावी तक (क्राऊन नाट्यसंस्था आणि स्टोरीया प्रॉडक्शन डोंबिवली), देव -बापा? (कलाकार मंडळी पुणे), हनिमून (एस. एम. प्रॉडक्शन ) तसेच रविवार दिनांक १२ जानेवारीला गोंद्या आणि कमुचा फार्स (रंगशाळा जळगाव), जापसाल (उगवाई कलारंग फोंडाघाट कणकवली), आविघ्नेया (सिडेनहॅम कॉलेज मुंबई ), बॉईल्ड- शुद्ध शाकाहारी (कलादर्शन व नाट्यशृंगार पुणे), बॉडी ऑफ नरेवाडी (फितूर थिएटर्स सोसायटी, संत झेवियर कॉलेज मुंबई), पाटी (एकदम कडक नाट्यसंस्था मुंबई) आणि वेदना सातारकर हजर सर (सी. के. ठाकूर स्वायत्त महाविद्यालय पनवेल) या एकांकिका सादर होणार आहेत.
- कोट -
महाराष्ट्रात नाटय चळवळ एक मोठी परंपरा आहे. नाट्य क्षेत्रातून कलाकार घडत असतात. त्या अनुषंगाने हि परंपरा कायम रहावी आणि नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावा, त्यांनी आपल्या अंगी असलेले कौशल्य सादर करून या क्षेत्रात उज्वल कामगिरी करावी हा उद्देश या अटल करंडकचा राहिला आहे. त्या अनुषंगाने ज्येष्ठ कलाकारांचा आशीर्वाद या स्पर्धेला मिळाला आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबाबत कटाक्षाने लक्ष देऊन हि स्पर्धा यशस्वी केली जाते. आणि त्याच पार्श्वभूमीवर दरवर्षी हि स्पर्धा अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी मेहनत घेतली जात आहे. - आमदार प्रशांत ठाकूर