विमानतळ, अटल सेतू प्रकल्पग्रस्तांच्या त्यागाचे फलित, सत्ताधाऱ्यांनी कामाचे श्रेय घेऊ नये; शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांचा घणाघात
उरण : आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अटल सेतू हे आम्ही केले, असे सत्ताधाऱ्यांकडून ठासून सांगितले जात आहे. पण हे प्रकल्प येथील भूमीपुत्रांच्या आणि प्रकल्पग्रस्तांच्या त्यागावर निर्माण झाले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या बलिदानाचा विसर पडणाऱ्यांना जनता नक्की धडा शिकवेल, असा घणाघात उरण शेकापचे उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांनी केला.
उरण विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान म्हात्रे यांनी विद्यमान आमदार महेश बालदी यांनी न केलेल्या कामांचा पाढा वाचला. जी विकासकामे विद्यमान आमदारांनी करायला पाहिजे होती, ती गेल्या पाच वर्षांत उरण शहर आणि तालुक्यात झालीच नाहीत. त्यामुळे उरण तालुका मागे पडला आहे; परंतु आता उरणच्या तरुणांच्या पाठिशी
शेकाप उभा राहिला असून घाबरण्याचे दिवस गेले, असे आव्हान म्हात्रे यांनी दिले. उरण तालुक्यात म्हात्रे यांच्या प्रचाराचा झंझावात दिवसेंदिवस वाढत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत प्रीतम म्हात्रे यांनी उडी घेतल्यामुळे उरण तालुक्यातील जुन्या आणि जाणत्या शेकाप कार्यकत्यांमध्ये स्फुरण चढले आहे. अशा परिस्थितीत म्हात्रे यांच्या प्रचाराला प्रतिसाद मिळत आहे. खरे तर नवी मुंबईत होणाऱ्या लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये लोकांना कामाला लावण्याचे खोटे आश्वासन महेश बालदी देत आहेत; परंतु विमानतळ झाल्यावर आपल्याला तिकडे फिरकूदेखील देणार नाहीत. अशा परिस्थितीत आत्तापासूनच विमानतळामध्ये कामाला लागण्याची तयारी करण्याची गरज म्हात्रे यांनी व्यक्त केली. गेल्या चार महिन्यांत जे. एम. म्हात्रे चॅरीटेबल ट्रस्टतर्फे प्रशिक्षण देऊन ४० जणांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये कामाला लावण्यास यश आल्याची माहिती म्हात्रे यांनी या वेळी दिली. उरणच्या पवित्र भूमीमध्ये दिवंगत दि. बा. पाटील आणि शेकापचे नेते जनार्दन भगत यांचे रक्त सांडले आहे. या दोघांच्या विचारांचे नेतृत्व करणाऱ्या उमेदवाराला उरणची जनता मतदान करेल. कोणी बाहेरून आलेल्या थापाड्याला मतदान करणार नाही, असा विश्वासही म्हात्रे यांनी व्यक्त केला.
उरणचा कायापालट करणार
शेकापतर्फे प्रीतम म्हात्रे जनतेचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेच्या सभागृहात गेला, तर उरण तालुक्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, अशी
ग्वाही म्हात्रे यांनी दिली. विद्यमान आमदाराने उरणच्या जनतेच्या तोंडाला पाने पुसली. महिलांवर अत्याचार होत असताना हे आमदार गैरहजर होते. भाजपचे नेते आल्यावर दिसण्यापुरते हजर राहत असणाऱ्या महायुतीच्या उमेदवाराला उरणच्या महिला धडा शिकवतील, असा विश्वास म्हात्रे यांनी व्यक्त केला.
मला जनता साथ देईल
स्थानिक लोकप्रतिनिधीने उरण तालुक्यातील समस्त आगरी बांधवांचा अवमान केला आहे. त्याबाबत येथील जनता त्यांना माफ करणार नाही. उलट शेकापच्या उमेदवाराला निवडून आणून आपली ताकद दाखवून देईल, असा विश्वास म्हात्रे यांनी व्यक्त केला. उरण विधानसभा मतदारसंघातील उरण तालुक्यातील चाणजे, नवघर, जासई व कोप्रोली या चारही भागातून प्रचंड बहुमत मिळणार आहे, असा विश्वास प्रीतम म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.