पर्यावरणपूरक दिवाळी उत्सव (ग्रीन फेस्टिव्हल) साजरा करण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील फटाके विक्री करणारे सर्व व्यावसायिक व फटाक्यांचा वापर करणारे नागरिक यांना आवाहन करण्यात येते की, भारत सरकार अधिसूचना क्रमांक G.S.R. 682 (E) Dt. 05/10/1999 अन्वये 125 dB (AI)पेक्षा जास्त आवाज निर्माण करणा-या फटाक्यांचे उत्पादन,विक्री किंवा वापर बेकायदेशीर आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार बेरियम सॉल्ट, लिथीयम, अर्सेनिक, लीड, मर्क्युरी यासारखे घटक असणारे फटाके वापरण्यास बंदी आहे. या घटकांमुळे विषारी वायू तयार होतात, हे वायू प्राणी व वनस्पती या दोघांना घातक आहेत. तसेच इतर वेळी सरासरी 91 इतक्या असणा-या हवा गुणवत्ता निर्देशांकामध्ये (AQI) दिवाळी सणादरम्यान फटाक्यांमधून निघणा-या विषारी घटकांपासून उद्भवणा-या वायू प्रदूषणामुळे सरासरी 212 इतकी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.वाढत्या वायूप्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनासंबंधीच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
जनहित याचिका क्र. 152/2015 मध्ये मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार फटाका विक्रेत्यांनी विस्फोटक व अधिनियम 1884 आणि त्या अंतर्गत केलेले विस्फोटक नियम 2008 मधील प्रतिबंध व नियम यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. तरी फटाके विक्रेत्यांनी बंदी असलेले फटाके विक्री करावयाची नाही, तसेच परवानगी असलेल्या फटाक्यांची महानगरपालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी परवानगी घेऊनच विक्री करावयाची आहे.
राष्ट्रीय हरीत लवाद मुख्य खंडपीठ, नवी दिल्ली यांचे दि.3/11/2023 रोजीचे सुनावणी आदेश तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे स्वतःहून दाखल करुन घेतलेली जनहितार्थ याचिका क्र.3/2023 च्या आदेश कलम 7 (ज) नुसार नागरिकांनी केवळ संध्याकाळी 7 ते रात्री 10 या कालावधीतच फटाके वाजवायचे आहेत.
सदर आदेशातील कलम 7 (क) नुसार सर्व शैक्षणिक संस्था यांनी याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणेबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात व फटाक्यांमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या हानीबाबत विद्यार्थ्यांना प्रबोधन करावयाचे आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने दक्षतेने अंमलबजावणी करावयाची आहे व सदर आदेशाच्या कलम 8 नुसार याची अंमलबजावणी होणेबाबत महानगरपालिकेचे संबंधित विभागीय सहाय्यक आयुक्त यांनी देखील पडताळणी करुन दक्षता घ्यावयाची आहे.
त्याचप्रमाणे मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी स्वत:हून दाखल केलेल्या जनहितार्थ याचिकेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना, अंमलबजावणी तसेच दंडात्मक तरतुदी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत याची नागरिकांनी / संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावयाची आहे.
महाराष्ट्र शासनाचे 'माझी वसुंधरा अभियान 5.0', 'स्वच्छ सर्वेक्षण 2024' आणि 'स्वच्छ वायू सर्वेक्षण’ अभियानांतर्गत' फटाकेमुक्त, प्लास्टिकमुक्त, कचरामुक्त, प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक (ग्रीन फेस्टिवल) सण-उत्सव साजरे करावयाचे आहेत. त्यानुसार नागरिकांनी मातीचे दिवे/पणत्या उजळवाव्यात, प्लास्टिकचा वापर टाळून कागदी किंवा कापडी आकाश कंदील लावावेत, फटाक्यांचा वापर टाळावा, प्लास्टिक ऐवजी कापडी किंवा कागदी पिशवीचा वापर करावा, झाडांवर विदयुत रोषणाई करु नये, सण - समारंभामध्ये टाकाऊ वस्तूंचा व पुनर्वापर करण्यायोग्य वस्तूंचा वापर करावा आणि पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी असे आवाहन करण्यात येत आहे.
तरी येणारी दिवाळी हरित व पर्यावरणपूरक साजरी करुया असे आवाहन करीत नमुंमपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांनी दिवाळीचा हा सण आनंदी व सुरक्षित राहो अशा सर्व नागरिकांना दिवाळी सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत.