पनवेल महानगरपालिकेच्यावतीने 'विद्यार्थी सुरक्षा व व्यवस्थापनाची भूमिका' या विषयावर कार्यशाळा
पनवेल, दि. 27 : पनवेल महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सुरक्षा विषयक उपाय योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणीसाठी आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या निर्देशानूसार “ विद्यार्थी सुरक्षा व व्यवस्थापनाची भूमिका" याबाबतची कार्यशाळा गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी साडे नऊ वाजता आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे आयोजित करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त श्री. मंगेश चितळे , अतिरीक्त आयुक्त श्री.भारत राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा होता आहे. बदलापूर येथे घडलेल्या अनुचित घटनेच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत शासन निर्णयानुसार महापालिकेचे शिक्षणाधिकारी श्री.रमेश चव्हाण यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे .या कार्यशाळेमध्ये अतिरीक्त सरकारी अभियोक्ता, स्थानिक पोलीस प्रशासन, शाळा व्यवस्थापन प्रतिनिधी व शिक्षण विभागातील अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी पोक्सो अधिनियम व त्यामधील तरतूदी, शाळा व्यवस्थापन ( संस्था, मुख्याध्यापक व व्यवस्थापन समिती) यांच्या विद्यार्थ्यांच्या संबधीच्या जबाबदाऱ्या, पोक्सो अधिनियम अंतर्गत दाखल होणारे गुन्हे व कार्यपध्दती, विद्यार्थी सुरक्षतेच्या दृष्टीने शाळा व्यवस्थापनाने करावयाच्या उपाय योजना व 21ऑगस्ट 2024 रोजीच्या शासन निर्णय अंमलबजावणी व शाळांनी स्थापन करावयाच्या विविध समित्या यांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कार्यशाळा महत्वाची असल्याने या कार्यशाळेस महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी शाळांचे संस्थाचे अध्यक्ष अथवा सचिव, सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सर्व खाजगी अनुदानीत, अशंत: अनुदानीत, विना अनुदानीत, स्वयं अर्थ सहाय्यित शाळांचे मुख्यध्यापक , प्राचार्य, सर्व माध्यमे ,सर्व व्यवस्थापनाच्या (प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक) सर्व बोर्डाच्या शाळांनी उपस्थित राहावे अशा सूचना महापालिकेच्या शिक्षण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.