नवी मुंबई एमआयडीसी भागातील उद्योग समुहांमध्ये 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण' योजना राबविण्याचे नियोजन
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण' योजनेच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेत 194 पदांसाठी सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्याकरीता शिकाऊ उमेदवार निवडण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमात 81 वाहक प्रशिक्षणाकरीता रुजू करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्याचप्रमाणे 22 ऑगस्ट रोजी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हॉटेल्स, जाहिरात व अभियांत्रिकी इ. खाजगी आस्थापनांवर विविध संवर्गातील 206 पदांसाठी नियुक्ती प्रक्रिया करण्यात येत आहे.
या योजनेव्दारे युवकांची क्रयशक्ती विधायक मार्गाने उपयोगात आणली जाणार असून युवकांच्या भविष्यातील प्रगतीसाठी हा प्रशिक्षण कालावधी महत्वाचा ठरणार आहे. याशिवाय प्रशिक्षण कालावधीचे विदयावेतनही त्यांना शासनामार्फत प्राप्त होणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एमआयडीसी भागामध्ये मोठया प्रमाणावर उदयोग समुह असून त्या ठिकाणी युवकांना विविध पदांकरिता प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध् होऊ शकतात हे लक्षात घेत नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे सूचनेनुसार, अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार यांचे समवेत एमआयडीसी प्राधिकरणाचे नवी मुंबई प्रादेशिक अधिकारी श्री.महेंद्र पटेल यांची भेट घेत एमआयडीसी क्षेत्रातील विविध उदयोग समुहांमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उत्तम रितीने राबविली जाऊ शकते व याचा उपयोग नवी मुंबईतील युवकांना मोठया प्रमाणावर होऊ शकतो अशी भूमिका मांडत नवी मुंबई महानगरपालिका या कामी संपूर्ण सहकार्य करेल असे सूचित केले.
यावेळी कौशल्य विकास विभागाचे ठाणे जिल्हास्तरीय अधिकारी श्री. विमलेश कुमार यांनी याप्रसंगी उपस्थित असलेल्या विविध संस्थांच्या पदाधिकारी वर्गास मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेची विस्तृत माहिती दिली.
त्याचप्रमाणे शनिवार दि. 24 ऑगस्ट रोजी होणाऱ्या उदयोग समुहांच्या वार्षिक सभेप्रसंगी उपस्थित उदयोग समुहांची महास्वयम् पोर्टलवर नोंदणी करुन त्यांच्या आस्थापनेत प्रशिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या जागाही नोंदविण्यात येतील असे सांगण्यात आले. त्यानंतर उपलब्ध् असलेल्या जागांवर पात्र युवकांची निवड करण्याकरीता पुढच्याच आठवडयात शिबीराचे आयोजन करण्यात येईल असे नमुंमपा अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी सांगितले.
याप्रसंगी टी टी सी एम.आय.डी.सी इंडस्ट्रिज असोसिएशन, ठाणे बेलापूर इंडस्ट्रिज असोसिएशन, मिलेनियम बिझनेस पार्क यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजने प्रमाणेच ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ योजनाही नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात यशस्वीपणे राबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबध्द अंमलबजावणी करण्यात येत असून युवकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल अशी सर्व प्राधिकरणे व आस्थापना यांना योजनेच्या कार्यकक्षेत आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.