नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घेतला सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेमध्ये पात्र लाभार्थी महिलांनी अर्ज दाखल करुन योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिक व्यापक प्रचार, प्रसिध्दी करावी व एकही पात्र महिला लाभ घेण्यापासून वंचित राहणार नाही याची काटेकोर काळजी घ्यावी तसेच शासनाच्या ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ योजनेचा लाभही नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील जास्तीत तरुणांना होईल यासाठी त्याची माहिती व्यापक प्रसिध्दी करण्याचे निर्देश नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिले. अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्यासह विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत सर्व विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेताना आयुक्तांनी सर्व विभागांनी पुढील दोन महिन्यातील कामाचे नियोजन करावे आणि त्याचा आराखडा सादर करावा असे निर्देश दिले.
कार्यालयात गतीमान, नियोजनबध्द व पारदर्शक कामकाजासाठी ई-ऑफिस प्रणाली लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने जलद कार्यवाही करावी तसेच ‘एक कर्मचारी - एक नस्ती’ अशी कार्यप्रणाली राबवून कार्यालयीन प्रणाली सुलभ होईल व नस्तींची संख्या मर्यादित राहील याकडे लक्ष दयावे असे निर्देश दिले.
शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच शिक्षकांचे प्रशिक्षण घेऊन त्यांचे माहिती व ज्ञान अदययावत करण्यासाठी ठोस पावले उचलावीत असे सांगतानाच अधिकाऱ्यांनी क्षेत्रिय पाहणी दौऱ्यासाठी जाताना त्या क्षेत्रातील शाळेलाही भेट देऊन तेथील कामकाजाची व स्वच्छतेसहीत इतर सुविधांची पाहणी करावी व त्याचा अहवाल सादर करुन त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी योगदान दयावे असे निर्देश आयुक्तांनी दिले.
महानगरपालिकेच्या शाळांचे वेगळेपण दर्शनी स्वरुपात दिसावे यादृष्टीने कार्यवाही करण्याचेही त्यांनी निर्देशित केले. स्मार्ट शाळांप्रमाणेच स्मार्ट नागरी आरोग्य केंद्रे असावीत याबाबत आरोग्य विभागाने कार्यवाही करावी असे आयुक्तांनी निर्देश दिले. तसेच आपला दवाखाना कार्यान्वित करणे, पशुवैदयकीय रुग्णालय सुरु करणे, पी जी इन्स्टिटयूट सुरु करणे याबाबतची कार्यवाही जलद करण्याचे निर्देशित करण्यात आले.
विविध नागरी सुविधा कामांसाठी शासनामार्फत व जिल्हा नियोजन समितीमार्फत विविध योजनांतर्गत उपलब्ध होणारा निधी प्राप्त करुन घेऊन त्याचा उपयोग नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सेवासुविधा पुरविण्यासाठी करण्यात यावा असे सूचित करीत आयुक्तांनी नमुंमपास प्राप्त होणारा शासकीय निधी पूर्णपणे वापरला जाईल याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देशित केले. अमृत 2, पंधरावा वित्त आयोग या शासकीय योजनांतर्गत सुरु असलेली कामे विहीत वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देत याबाबतच्या सदयस्थितीची माहिती लगेच सादर करावी असे निर्देशित करण्यात आले.
परवाने ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याची प्रक्रीया जलद करण्याचे निर्देशित करीत एकेक करुन सर्व परवाने ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याचे निर्देश त्यांनी दिले. क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देताना त्याची सुयोग्यता पाहणे व गुणवत्ता राखणे याकरिता विविध खेळातील तज्ज्ञांची मार्गदर्शक समिती स्थापन करण्याबाबत जलद कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या मालमत्तांचे डिजिटलायझेशन करण्याचेही निर्देश यावेळी देण्यात आले.
आगामी कालावधीत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल हे लक्षात घेऊन त्या काळातील गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दिवाळी अशा उत्सवांच्या अनुषंगाने व पूर्तता करावयाच्या आवश्यक नागरी सुविधा कामांच्या अनुषंगाने आगामी काळात करावयाच्या कामांचे नियोजन करावे व त्यासाठी आवश्यक असलेली कार्यालयीन कार्यवाही जलद पूर्ण करावी अशाही सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.
स्वच्छतेच्या अनुषंगाने नागरिकांपर्यंत पोहचून स्वच्छता कार्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग घेण्याच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहीमा व उपक्रम यांचे प्रमाण वाढवावे असे निर्देशित करीत माझी वसुंधरा अभियानांतर्गतही मोठया संख्येने वृक्षारोपण – संवर्धन उपक्रम राबवावेत व त्यांची व्यापक प्रसिध्दी करावी असेही निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिका कोणतेही काम अत्यंत प्रभावीपणे करते हा लौकिक असून महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना’ लाभार्थी महिलांपर्यंत पोहचवून, त्यांचे त्यासाठी अर्ज भरुन घेऊन, त्यांना लाभ मिळवून देण्याचे महिला कल्याणकारी कामही नेहमीसारखेच प्रभावीपणे करावे व त्यासाठी महानगरपालिकेने सर्व प्रभागांमध्ये सुरु केलेल्या 111 मदत कक्षांव्दारे कृतीशील कामगिरी करावी असे स्पष्ट निर्देश नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिले.