मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेचा कोकणातील महिलांनी लाभ घ्यावा-कोकण विभागीय आयुक्त पी.वेलरासू
नवी मुंबई,दि.12 :- राज्यातील महिलांच्या बळकटीकरणासाठी संपूर्ण राज्यभरात लागू केलेल्या मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेची कोकण विभागात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक ग्रामंपचायतीच्या माध्यमातून या योजनेचे मोफत अर्ज उपलब्ध करुन देण्याच्या सूचना संबधित यंत्रणांना देत कोकण विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी कोकण विभागातील महिलांना मोठयासंख्येने या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
महिला व बाल विकास विभागातर्फे दिनांक 28 जून 2024 पासून मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना राज्यभर राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दरमहा 1 हजार 500 पाचशे रुपयांची मदत मिळणार आहे. या योजनेची कोकण विभागात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, लाभार्थी महिलांची फरफट होऊ नये, यासाठी संबधित यंत्रणाना दक्षता घेण्यासोबतच विविध उपाययोजना करण्याचे आदेश आयुक्त पी.वेलरासू यांनी दिले आहेत.
कोकण विभागातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहीत आणि विधवा,घटस्फोट, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटूंबातील केवळ एक अविवाहीत महिला यांना मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत घेता येईल. शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रुपये 1 हजार 500 पाचशे किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमेचा लाभ घेत असल्यास त्यांना ही योजना लागू होणार नाही. अर्जदाराच्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकर पेक्षा शेत जमीन आहे ही अपात्रतेची अट वगळण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्याऐवजी त्या महिलेचे 15 वर्षपूर्वीचे शिधापत्रिका किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, या चारपैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहे. परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे (१) जन्म दाखला किंवा (२) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा (३) अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते. याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीची शिधापत्रिका व 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र देखील ग्राह्य धरण्यात येईल.
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करणे किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतेही शुल्क शासनातर्फे आकारले जात नाहीत. त्यामुळे महिलांनी भूलथापांना बळी न पडता आर्थिक नुकसान करुन घेऊ नये असे आवाहन आयुक्त पी.वेलरासू यांनी केले आहे. योजनेबद्दल अधिक माहितीसाठी महिला व बालविकास विभागाचा दि.28 जून 2024 चा शासन निर्णय पहावा. तसेच योजनेतील सुधारणा पाहण्यासाठी महिला व बालविकास विभागाचा दि.03 जुलै,2024 व दि.12 जुलै,2024 चा शासन निर्णय पाहावा.
कोकण विभागात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचे अंमलबजावणी नियोजनबध्द होईल. लाभार्थ्यांना योजनेचा सुलभ लाभ मिळेल. त्या अनुषंगाने अडचणी आल्यास जिल्हा कार्यक्रम अधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहनही आयुक्त पी.वेलरासू यांनी केले आहे. ग्रामपंचायत पातळीवर या योजनेचे अर्ज उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात आल्याअसून लाभार्थी महिला,अंगणवाडी सेविका, बचतगटाचे अध्यक्ष, सचिव, ग्रामसेवक या योजनेचे अर्ज भरुन देऊ शकतात.
कोकण विभागातील महिलांनी मोठयासंख्येने मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा आणि कोकण विभागाला राज्यात सर्वात जास्त महिला लाभार्थीचा विभाग म्हणून अग्रेसर करावे असे आवाहन कोकण विभागीय आयुकत पी.वेलरासू यांनी केले आहे.