अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची आपत्कालीन मदत यंत्रणा कार्यरत;सर्व यंत्रणेला सुसज्ज राहण्याचे आयुक्त श्री.मंगेश चितळे यांचे आदेश
पनवेल,दि.25: पनवेल महापालिका क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून भारतीय हवामान विभागाने 26 जुलैला रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट दिला असून मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान गुरूवारी पहाटेपासूनच पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात मुसळधार पाऊसास सुरूवात झाली असून , या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर असून पाणी साठणाऱ्या भागावरती अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. तसेच सर्व यंत्रणेला सुसज्ज राहण्याचे निर्देश आयुक्त श्री. मंगेश चितळे यांनी दिले आहेत.
जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना चोवीस तास सतर्कता बाळगण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. दरम्यान अतिरीक्त आयुक्त भारत राठोड यांनी कळंबोलीमधील विविध भागांना भेट देऊन परिस्थितीची पहाणी केली. कळंबोली मधील 29 पंपाच्या माध्यमातून रस्त्यावरील पाणी काढण्यात येत असून याठिकाणी कोठेही पाणी साठणार याची काळजी महापालिकेच्यावतीने घेण्यात येत आहे. तसेच अतिरीक्त आयुक्त व उपायुक्त कैलास गावडे यांनी पनवेल शहरातील कोळीवाडा ,पटेल मोहल्ला,भारत नगर झोपडपट्टी इत्यादी ठिकाणी पूर परिस्थितीची पाहणी केली.
गाढी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्या मुळे कच्छी मोहल्ला व पटेल मोहल्ला येथील नागरिकांना सुरक्षित जागी उर्दु प्राथमिक शाळा येथे स्थलांतरीत करण्यात आले असून व त्यांच्या चहा ,जेवण, आरोग्य सेवा व पाण्याची सोय पनवेल महानगरपालिका तर्फे करण्यात आली. तसेच वैद्यकिय आरोग्य विभागाच्यावतीने मदत सुरू करण्यात आली आहे. हवामान खात्याने शुक्रवारी देखील रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी महापालिकेच्यावतीने सर्व तयारी करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदत यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त कैलास गावडे यांनी दिली आहे.
चारही प्रभागातील प्रभाग अधिकाऱ्यांना त्या त्या विभागातील अद्ययावत माहिती देण्याविषयी आयुक्तांनी सूचित केले आहे. कळंबोली मध्ये भरपूर पाणी साठते, त्यामुळे कळंबोली मधील पाणी उपसा करणारे डिझेल व इलेक्ट्रिक पंप सातत्याने सुरु ठेवण्याच्या सूचना प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच पनवेल मध्ये गाढी नदीच्या पाणी पातळीवर देखील लक्ष ठेऊन याबाबतची माहिती देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
नागरिकांची सुरक्षितता व काळजी घेण्यासाठी महापालिका तत्पर असून कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन आयुक्त श्री. मंगेश चितळे यांनी केले आहे. महापालिकेच्या सर्व विभागांनी आयुक्तांच्या निर्देशानुसार आपापसात योग्य समन्वय ठेवून "अलर्ट मोड' वर काम करावे, योग्य नियोजन करून उपाययोजना कराव्यात, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त व उपायुक्तांनी महापालिकेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.