पंचायतन मंदिराचा दुसरा वर्धापनदिन उत्साहात साजरा
पनवेल : चौक परिसरातील जे. एम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे नढाळ येथील श्री क्षेत्र पंचायतन मंदिर हे अतिशय प्रसिद्ध, नावाजलेलं आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. याठिकाणी दररोज असंख्य लोकं भेट देत असतात अशा या प्रसिद्ध पंचायतन मंदिराचा दुसरा वर्धापनदिन सोहळा सोमवारी ता. १३ मे रोजी पार पडला. अतिशय उत्साहात पंचायतन मंदिराचा दुसरा वर्धापन दिन साजरा झाला.
यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ट्रस्टचे अध्यक्ष प्रितम म्हात्रे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. मंदिरात पहाटे सहा वाजता काकड आरती, व सर्व देवीदेवतांचे अभिषेक, पूजन, दुपारी भजन, सायंकाळी पालखी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर ह.भ.प. लांबे महाराज यांचे कीर्तन झाले. या वेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. परिसरातील सर्व भाविकांनी दर्शनाला गर्दी केली होती. तसेच यावेळी प्रितम म्हात्रे भाविकांशी संवाद साधत होते. कार्यक्रमानिमित्त मंदिराना आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली होती.