एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाईत 85 हजार दंडात्मक रक्कम तसेच 39.750 किलो प्लास्टिक जमा
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र एकल वापर प्लास्टिकमुक्त असावे यादृष्टीने महानगरपालिकेच्या वतीने याविषयी जनजागृती करण्यासोबतच महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देशानुसार एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. सर्वच विभाग कार्यक्षेत्रात संबंधित विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे.
अशा एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमेअंतर्गत 15 ते 22 मे 2024 या आठवड्याभराच्या कालावधीत विभागीय कार्यक्षेत्रात 71 ठिकाणी तपासणी करण्यात आली आणि दंडात्मक कारवाई तसेच प्लास्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली. यामध्ये दोषी आढळलेल्या 17 व्यावसायिक व आस्थापनांकडून एकूण रू. 85 हजार दंडात्मक रक्कम तसेच 39 किलो 750 ग्रॅम प्लास्टिक पिशव्यांचा साठा तसेच एकल वापर प्लास्टिक जप्त करण्यात आले.
यामध्ये बेलापूर विभागात 7 व्यावसायिक / आस्थापनांवर कारवाई करीत 35 हजार दंडात्मक रक्कम व 24 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. वाशी विभागात 3 व्यावसायिक / आस्थापनांवर कारवाई करीत 15 हजार दंडात्मक रक्कम व 3 किलो एकल वापर प्लास्टिकची जप्ती केली. ऐरोली विभागातही 3 व्यावसायिक / आस्थापनांवर कारवाई करण्यात आली व त्यामध्ये 15 हजार दंड वसूली व 10 किलो 500 ग्रॅम एकल वापराचे प्लास्टिक जप्ती करण्यात आली. परिमंडळ 2 विभागाच्या भरारी पथकाने 4 व्यावसायिकांवरील कारवाईत 20 हजार दंडात्मक रक्कम वसूली आणि 2 किलो 250 ग्रॅम एकल वापर प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला.
अशाप्रकारे या आठवड्यात 17 व्यावसायिक / आस्थापनांकडून 85 हजार दंडात्मक रक्कम वसूली तसेच 39 किलो 750 ग्रॅम एकल वापर प्लास्टिकचे साहित्य जप्त करण्यात आलेले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ही एकल प्लास्टिक वापर प्रतिबंधात्मक कारवाई अशीच सुरू राहणार असून नागरिकांनीही पर्यावरणास व मानवी जीवनास विघातक अशा एकल वापर प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवावा असे आवाहन करण्यात येत आहे.