प्रदुषण नियंत्रणासाठी पनवेल महापालिकेचा मल्टिपर्पज डस्ट सप्रेसशन व्हेइकलचा उतारा


प्रदुषण नियंत्रणासाठी पनवेल महापालिकेचा  मल्टिपर्पज डस्ट सप्रेसशन व्हेइकलचा उतारा


पनवेल,दि.24: पर्यावरणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि नागरिकांना आरोग्यदायी राहणीमान देण्यासाठी तसेच पनवेल महानगरपालिकेने आपल्या कार्यक्षेत्रात धूळीवरती नियंत्रण आणण्याच्या द्ष्टीने पर्यावरण विभागाच्यावतीने खरेदी केलेल्या मल्टिपर्पज डस्ट सप्रेसशन व्हेइकल्स (धूळ शमन वाहन) महापालिकेच्या वाहन ताफ्यात सज्ज झाल्या आहेत. या गाड्या कशा पध्दतीने काम करतात याचा आढावा आयुक्त डॉ.प्रशांत रसाळ यांनी नुकताच घेतला.यावेळी उपायुक्त डॉ. वैभव विधाते, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, घनकचरा व आरोग्य विभाग प्रमुख अनिल कोकरे, वाहन विभाग प्रमुख राजेश डोंगरे स्वच्छता निरीक्षक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पर्यावरणाचे भान जपण्यासाठी पनवेल महानगरपालिका माझी वसुंधरा संकल्पनेअंतर्गत विविध कार्यक्रम राबवत असते. या कार्यक्रमाच्या जोडीला महापालिकेने नुकतीच दोन अत्याधुनिक बहुउद्देशीय स्प्रेअर आणि डस्ट सप्रेशन व्हेइकल्स् खरेदी केली आहेत. अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज असलेले ही वाहने हवेतील धूलिकणांचा सामना करण्यासाठी  उपयुक्त आहेत. यामध्ये फवारणी आणि साफसफाईच्या उद्देशाने 6000 लीटरची पाण्याची टाकी, एअर कर्टन-आधारित वॉटर मिस्ट सप्रेशन सिस्टीम, फ्रंट आणि रिअर रोड फ्लशिंग सिस्टीम, ग्रीन बेल्ट गार्डनिंग क्लिनिंग सिस्टीम, आणि उंच झाडांवरील धूळ साफ करण्याच्या दृष्टीने  वैशिष्ट्य पूर्ण यंत्रणा यामध्ये समाविष्ट आहे. 

ही वाहने दररोज अंदाजे 80 किलोमीटर अंतर कापतात, ज्यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्राचा विस्तृत परिसर स्वच्छ करणे सोपे होणार आहे. ही बहुउद्देशीय वाहने केवळ धूळ कमी करत नाही तर रस्ता आणि  दुभाजकांमधील हरित पट्टा स्वच्छ करण्यासही मदत करतात.

वाढत्या औद्योगिकीकरणाने दिवसेंदिवस वाढणारी धूळ कमी करण्यासाठी ही वाहने पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. वाढते बांधकाम क्रियाकलाप आणि वाहनांची वाहतूक त्यामुळे हवेमध्ये धूलिकणांचे प्रमाण वाढून हवेची गुणवत्ता खराब करतात. यामुळे  लहान मुले, वृद्ध आणि श्वसनाची समस्या असलेल्या व्यक्तींच्या आरोग्यासही धोका निर्माण होते. याकरीता उपाय योजना म्हणून महापालिकने धूळीचा प्रभाव कमी करणारे बहुउद्देशीय स्प्रेअर आणि डस्ट सप्रेशन व्हेईकल खरेदी केली आहेत. ही वाहने हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करून पनवेलच्या रहिवाशांसाठी संपूर्ण स्वच्छता, सुरक्षितत वातावरण देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

धूळ दाबणे आणि साफसफाई करण्यासाठी या वाहनामध्ये वापरण्यात येणारे पाणी  हे मलनिस्सारण केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी वापरणार असल्याने  गोड्या ,चांगल्या पाण्याची बचत होणार आहे. या दोन्ही गाड्यांवरती एकूण 2.66 कोटी रुपये खर्चून पनवेल महानगरपालिकेने पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे. पर्यावरणीय गुणवत्ता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही वाहने दीर्घकालीन फायदे देणारी ठरणार आहेत.