पनवेल तहसीलदारांची अशी ही रुग्णसेवा-किरण पाटील यांच्या प्रयत्नामुळे मीळाले मोफत उपचार
खारघर (प्रतिनिधी)- खारघर येथील श्री दीपक पिल्ले यांना हृदयविकाराचा त्रास होत असल्याकारणाने त्यांच्यावर डॉक्टरांनी सांगितल्यानुसार लगेच हृदय शस्त्रक्रिया (एन्जोप्लास्टी) करणे गरजेचे होते परंतु त्यांची परिस्थिती हलाखीची असल्याकारणाने त्यांना कुठल्याही खाजगी मोठ्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. त्यांची पत्नी दीपा पिल्ले यांनी सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांच्याकडे धाव घेत मदतीची मागणी केली. सदर बाब किरण पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रुग्णालयांची संपर्क साधला असता सदर रुग्णाकडे जर नारंगी रेशन कार्ड असेल तर त्यांचे हृदय शस्त्रक्रिया हे मोफत होऊ शकते असे सांगितले. सदर कुटुंबाकडे शिधापत्रिका नव्हती व जी शिधापत्रिका होती ती रुग्णाच्या वडिलांच्या नावाने होती व ती पांढरी असल्याकारणाने त्यांना त्या योजनेचा लाभ घेता येत नव्हता हीच बाब कार्यतत्पर कार्यकर्ते किरण पाटील यांनी पनवेलचे कार्यक्षम तहसीलदार विजय पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली व तहसीलदार विजय पाटील यांनी देखील तात्काळ एक कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी कसा असतो याचे एक उदाहरण म्हणून त्यांनी तात्काळ किरण पाटील यांनी केलेल्या वैद्यकीय मदतीसाठी प्रशासकीय अडचणी बाजूला ठेवत तात्काळ सदर रुग्णाला मदतीच्या भावनेने शिधापत्रिका वेगळी करून दिली व त्यामुळे दिनांक 2 फेब्रुवारी रोजी वाशी येथील एमजीएम रुग्णालयात सदर रुग्णावर मोफत हृदय शस्त्रक्रिया पार पाडली. आता दीपक पिल्ले हे अतिशय आनंदी आहेत व त्यांनी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांना घेत पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन धन्यवाद व्यक्त केले. दीपक पिल्ले यांनी सांगितले की तहसीलदारांच्या कर्तव्यदक्ष पणामुळे आज माझे प्राण वाचले आहेत त्यामुळे अशा अधिकाऱ्याला परमेश्वर उदंड आयुष्य देवो. तहसीलदारांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांनी देखील केले.
किरण पाटील हे खारघरमधील कोणाही अडचणीत असलेल्या व्यक्तिंला वैद्यकीय मदत देण्यात नेहमी तत्पर असतात.खारघरमधील जनता त्यांच्याकडे राजकीय कार्यकर्ता म्हणून न पाहता सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच अधिक पाहतात त्यांच्या या समाजसेवेच्या वृतामध्ये त्यांच्या सौभाग्यवती,पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौ.नेत्रा पाटील यांचे मोलाचे सहकार्य असते.