माथाडी कामगारांचे भाग्यविधाते व आराध्यदैवत कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन व भावपुर्ण श्रध्दांजली...
*"आजही अण्णासाहेब हयात आहेत..."*
माथाडी कामगार चळवळीच्या देदिप्यमान इतिहासात माथाडी कामगारांचे आराध्यदैवत कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांचं नांव, कार्य आणि त्यांनी माथाडी कामगारांसाठी निर्माण केलेला सुवर्णमहोत्सवी माथाडी कामगार कायदाही अजरामर आहे, या कायद्यात बदल करण्यासाठी सत्ताधा-यांकडून अनेक वेळा डावपेचही आखण्यात आले पण अण्णासाहेबांच्या संघटनेने ते हाणून पाडले. आजही माथाडी कायद्यात बदल करण्यासाठी सुधारणा विधेयक सरकारतर्फे आणण्यात आले आहे, पण अण्णासाहेबांच्या संघटनेने हे विधेयक राखून धरलेले आहे आणि या विधेयकाच्या आधारे माथाडी कामगार कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या सुधारणा करण्यास तीव्र नकार दर्शविला आहे. सरकाने या कायद्याचे पुनरावलोकन करण्यासाठी माथाडी नेते आणि शासनाच्या विविध विभागाच्या अधिका-यांची समिती गठीत केली आहे. या समितीचा निकाल कायद्याच्या विरोधात गेल्यास पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडण्याचा अण्णासाहेबांच्या संघटनेने इषाराही दिलेला आहे. विशेष म्हणजे इतिहासात अनेक कामगार नेते निर्माण झाले, त्यांनी कामगारांसाठी केलेले ऐतिहासिक नेतृत्व आणि त्यांचे कार्य अजरामर राहिलं. परंतु त्यांच्या कार्याला चालना देऊन उत्तरोत्तर त्यांचं कार्य संघटनेच्या माध्यमातून पुढे नेणा-या संघटना क्वचितच दिसून येतात. मात्र कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी निर्माण केलेली कामगार नेत्यांची फौज व कामगार कार्यकर्ते यांनी अण्णासाहेबांच्या जयघोषाने त्यांचं कार्य अक्षय ठेवण्यासाठी अहोरात्र झटत आहेत म्हणूनच अण्णासाहेब हयात आहेत, याचा प्रत्यय वेळोवेळी येतो त्यांच्या ऐतिहासिक कार्याचा आणि त्यांच्या पश्चात संघटनेच्या ऐतिहासिक वाटचालीचा आजच्या त्यांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त आढावा घेणे उचित आहे.
महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संस्थापक, मराठा आरक्षणाचे आद्य प्रवर्तक, अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक आणि माथाडी कामगारांचे आराध्यदैवत कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांची २३ मार्च रोजी पुण्यतिथी माथाडी भवन, नवीमुंबई येथे हजारो माथाडी कामगारांच्या उपस्थितीत अण्णासाहेबांच्या संघटनेच्यावतीने साजरी होत आहे. सर्वसामान्य माथाडी कामगार म्हणून तत्कालिन अन्याय, अत्याचार व आर्थिक पिळवणुकीच्या दुष्टचक्रात पिचलेल्या तमाम माथाडी कामगारांना मुक्त करण्यासाठी अहोरात्र पायपिट करुन अण्णासाहेबांनी अजोड ऐतिहासिक संघर्ष केला. अॅड्. काशिनाथ वळवईकर आणि आपल्या लढाऊ कार्यकर्त्यांच्या साथीने माथाडी कामगार संघटनेची स्थापना अण्णासाहेबांनी केली. तत्कालिन दाहक परिस्थितीतून याच संघटनेच्या माध्यमातून माथाडी कामगारांना शोषण मुक्त केले.
अण्णासाहेबांचे मूळ गांव सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातील मंदुळकोळे-ढेबेवाडी. ग्रामीण परिसरातील सोयी-सुविधांच्या आणि रोजगाराच्या बाबतीत दुर्गम भागातील त्यांचे गांव विकासाच्या दृष्टीने अतिमागास होते तर रोजीरोटीपासूनही बंचित होते. म्हणूनच अण्णासाहेब रोजगार मिळविण्यासाठी मुंबईत आले. सुरुवातीला अण्णासाहेबांनी गोदीमध्ये क्रेनऑप्रेटर म्हणून नोकरी केली. मसजिबंदर परिसरातील दारुखाना येथे १० X १० च्या खोलीत आपला प्रपंच थाटला, पण याच परिसरात फेरफटका मारताना त्यांना दिसून आले की, विविध बाजारपेठांमध्ये हमालीचं काम करणा-या कष्टक-यांचं जीवन अतोनात अन्याय, अत्याचार आणि आर्थिक पिळवणुकीच्या समस्यांनी वेढलेले असून, घाम गाळून कष्ट करणा-या या श्रमिकांचं जीवन बदलणे गरजेचे आहे, म्हणूनच अण्णासाहेबांनी आपल्या उदरनिर्वाहाच्या नोकरीची पर्वा न करता आपल्या सहका-यांच्या पाठींब्याने मसजिदबंदर आणि मुंबईच्या इतर परिसरात अहोरात्र फिरुन हमालीचं काम करणा-या कष्टक-यांना संघटीत करुन कामगारांची "महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन (रजि.)" ही बलाढ्य संघटना स्थापन केली. पुढे याच संघटनेच्या बळावर त्यांनी या कामगार व कार्यकर्त्यांच्या एकसंघ शक्तीने हमालीचं काम करणा-या कामगारांच्या समस्या सरकारने तात्काळ सोडवाव्यात म्हणून लोकशाही मार्गाने अनेक ऐतिहासिक आंदोलने, उपोषणे, मोर्चे या अस्त्रांचा वापर करुन तत्कालिन सरकारला सन १९६९ साली ऐतिहासिक असा माथाडी कामगार कायदा करण्यासाठी भाग पाडले. ऐवढेच नव्हेतर तत्कालिन मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या सरकारने उदार अंतःकरणाने मान्यता दिलेल्या या कायद्याच्या निर्मितीनंतर पुन्हा अभूतपुर्व असा संघर्ष करुन सन १९७२ साली व्यवसायानुसार माथाडी कामगारांची मंडळे असावी ही मागणी शासनाला पटवून दिली आणि म्हणूनच सरकारने ३६ माथाडी मंडळांची स्थापना केली, यामुळे माथाडी कामगारांचे जीवनमान सुधारले आणि माथाडी कामगार शोषणमुक्त झाले. कामगारांसाठी ऐवढेच नव्हेतर दूरदृष्टीने संघटनेमार्फत माथाडी कामगार सहकारी पतपेढी, ग्राहक सोसायटी, माथाडी हॉस्पीटल अशा सुविधांचीही निर्मिती अण्णासाहेबांनी केली. अशा या कामगार आणि समाजाभिमुख योध्याने मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतिने २२ मार्च, १९८२ रोजी मंत्रालयावर मराठा समाजाचा भव्य मोर्चा आयोजित केला, मात्र तत्कालिन सरकारने त्यांच्या मागणीचा विचार न केल्यामुळे दुर्देवाने त्यांना दुस-या दिवशी म्हणजे दि.२३ मार्च, १९८२ रोजी आपल्या प्राणाचे बलिदान द्यावं लागलं. तरीही अण्णासाहेब यांच्या आशिया खंडातील बलाढ्य अशा माथाडी कामगार संघटनेचं कार्य आणि संघटनेच्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून हयात आणि अमर आहेत हे आजपर्यंतच्या संघटनेच्या विधायक कार्यातून सिध्द झालं आहे. म्हणूनच गेली ४२ वर्षे आपल्याला अण्णासाहेब अमर रहे !! अण्णासाहेब अजरामर आहेत, अशा गगनभेदी घोषणा आपल्याला संघटनेच्या माध्यमातून उभारलेली आंदोलने, मोर्चे, उपोषणे इत्यादी कार्यक्रमातून ऐकायला मिळतात. त्याबरोबरच अण्णासाहेबांची शिकवणुक आणि अचुक मार्गदर्शन तसेच लढाऊ कार्यकर्ते व नेत्यांची फौज निर्माण करण्याची अनोखी हातोटी होती म्हणूनच अन्याय, अत्याचार, शोषण, पिळवणुक इत्यादी समस्यांना तत्कालिन परिस्थिती- नुसार शह कसा द्यावा हे संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कामगार यांच्या आजपर्यंतच्या संघटीत कार्यातून आणि लढ्यातून दिसून येते.
अण्णासाहेबांच्या निधनानंतर त्यांचे जेष्ठ चिरंजिव संघटनेचे सरचिटणीस शिवाजीराव पाटील यांनी संघटनेचं अस्तित्व अबाधीत ठेवले, अनेक यशस्वी लढे, आंदोलने उभारली. माथाडी कामगारांसाठी सरकारमार्फत सिडकोकडून घरे मिळण्याच्या योजनेला गतीमान केले आणि हजारो माथाडी कामगारांना निवारा उपलब्ध करुन दिला. याशिवाय अण्णासाहेबांनी स्थापन केलेल्या सामाजिक उपक्रमांना उत्तरोत्तर प्रगत करुन अण्णासाहेबांच्या कार्याला चालना दिली. तर शिवाजीराव पाटील यांच्या निधनानंतर संघटनेचे सरचिटणीस संभाजीराव पाटील यांनी संघटनेची धुरा यशस्वीपणे पेलली. संभाजीराव पाटील यांच्या निधनानंतर कालानुरुप बदललेल्या परिस्थितीमुळे अण्णासाहेबांच्या संघटनेपुढे अनेक संकटे उभी ठाकली, कामगार क्षेत्रामध्ये अनेक घडामोडी घडल्या, सरकारने कामगार कायद्यांमध्ये बदल केले, अनेक सार्वजनिक कारखाने तसेच खाजगी उद्योगही बंद पडले, बेरोजगारीमध्ये भर पडली, याचा परिणाम माथाडी कामगारांच्या रोजगारावरही झाला, त्यातच गेल्या कांही वर्षांमध्ये माथाडी कामगारांच्या अनेक सौदेबाज, खंडणी उकळणा-या संघटना उदयास आल्या, तरीही अण्णासाहेबांचे सुपुत्र नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या खंबीर नेतृत्वाखाली संघटनेचं कार्य निस्वार्थीपणे जोमाने सुरुच आहे. गेली अनेक वर्ष या संघटनेचे सरचिटणीस या पदावरील नेतृत्व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील तसेच कार्याध्यक्ष म्हणून आमदार शशिकांत शिंदे, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप हे अण्णासाहेबांचे खंदे शिलेदार पहात आहेत. गेल्या २५ वर्षात माथाडी कामगारांचा रोजगार आणि संघटनेचं अस्तित्व टिकविण्याचे अजोड कार्य या तिघांनी केले आहे. माथाडी कामगारांच्या प्रा. फंडाच्या समस्येचं निराकरण दिल्ली येथे जाऊन याच नेत्यांनी केलं. तर कोव्हीड महामारीच्या काळात माथाडी कामगारांचा रोजगार टिकविण्यासाठी तसेच जनतेला माथाडी कामगारांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्याकरीतां याच नेत्यांनी व संघटनेच्या कामगार-कार्यकर्त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेतली. तसेच माथाडी कामगारांच्या जटील समस्या सोडविण्यासाठी सतर्क राहून सातत्याने लढे व आंदालने उभारली. विशेष म्हणजे गेल्या २५ वर्षात महाराष्ट्रात विविध पक्षाच्या नेतृत्वाखाली अनेक सरकारे स्थापन झाली पण आपल्या आमदारकीच्या कालावधीत नरेंद्र पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी सभागृहात माथाडी कामगारांच्या अनेक समस्या आपल्या भाषणातून उपस्थित करुन त्या समस्या सोडविण्यास सरकारला भाग पाडले. सरकार कोणत्याही पक्षाचे असो किंवा आपल्या पक्षाचे असो, माथाडी कामगारांचा आवाज बुलंद करण्यास ते कधीच डगमगले नाहीत. तरीही माथाडी कामगारांच्या अनेक समस्या अजूनही सरकारदरबारी प्रलंबित आहेत. सरकारने त्या सोडवाव्यात म्हणून अण्णासाहेबांचे हे शिलेदार सतत जागृत असतात. आतां अण्णासाहेबांचे शिलेदार नरेंद्र पाटील, शशिकांत शिंदे आणि गुलाबराव जगताप यांच्यापुढे माथाडी कामगारांच्या अनेक समस्यांचे आव्हान असले तरी संघटीतपणे नेतृत्व करुन संघटनेचे अस्तित्व अबाधीत ठेवणे ही जबाबदारी तर आहेच पण आतां नव्याने एक जबरदस्त आव्हान समोर उभं आहे ते म्हणजे गेल्यावर्षी सरकारने अण्णासाहेबांनी निर्माण केलेल्या ऐतिहासिक माथाडी कायद्यालाच मोडीत काढण्याचा चंग बांधला आहे. यासाठी सरकारने सुरक्षा आणि माथाडी कायदा सुधारणा विधेयक आणले असून, जर या विधेयकाची अंमलबजावणी झाली तर ८० टक्के माथाडी कामगारांचा रोजगार संपुष्टात येणार आहे, याची अण्णासाहेबांच्या संघटनेने तात्काळ दखल घेऊन हे विधेयक रद्द करण्यासाठी अनेकदा सरकारला जागृत केले. माथाडी कामगारांची रोजीरोटी हिसकावून घेणारे हे विधेयक मागे घ्यावे, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी सभागृहात आणि नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे केली आहे. पण सरकार कांही मागे हटले नाही यास्तव दि.२६ फेब्रुवारीपासून चार दिवस अण्णासाहेबांच्या संघटनेच्या पुढाकाराने कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली ११ माथाडी कामगार संघटनांच्यावतिने आमरण उपोषणही केले. अखेर सरकारने या माथाडी कायदा सुधारणा विधेयकाचा पुनर्विचार करण्यासाठी माथाडी कामगार संघटनेचे प्रतिनिधी आणि चार शासकिय अधिकारी मिळून कमिटी स्थापन केली आहे या कमिटीचा निर्णय कामगारांच्या विरोधात गेलातर पुन्हा एकदा आणखी उग्र आंदोलन उभारण्यात येईल असा इषाराही अण्णासाहेबांच्या संघटनेने दिला आहे.
वर उल्लेख केलेल्या अण्णासाहेबांच्या कामगार संघटनेने अण्णासाहेबांच्या पश्चात माथाडी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी सातत्याने अण्णासाहेबांच्या शिकवणुकीनुसार उभारलेले लढे, आंदोलने तसेच नेत्यांनी माथाडी कामगारांचे आणि संघटनेचे अस्तित्व अबाधीत ठेवण्यासाठी आजपर्यंत जीवापाड मेहनत घेऊन अण्णासाहेब आजही हयात आहेत याची साक्ष दिलेली आहे. म्हणूनच आजच्या त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हेच म्हणायला पाहिजे की "आजही अण्णासाहेब हयात आहेत"
अण्णासाहेब पाटील... अमर रहे !! अण्णासाहेबांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन व भावपुर्ण श्रध्दांजली.