भाजल्याने तिघांचा मृत्यू

 भाजल्याने तिघांचा मृत्यू 

नवीन पनवेल : कळंबोली येथील स्टील मार्केटमध्ये शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तिघा जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची नोंद कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
        9 जानेवारी रोजी कळंबोली स्टील मार्केट येथील वाहने स्क्रॅप करताना शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. या आगीमध्ये मालकासह पाच ते सहा जण गंभीर भाजले. त्यांना कुर्ला येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यातील दोघांचा काही दिवसातच मृत्यू झाला तर तिसऱ्या व्यक्तीचा 31 जानेवारी रोजी मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. या आगी बाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या ठिकाणी काम करणारे कामगार यांची नोंदणी केली होती का? तसेच स्क्रॅपिंग करताना परवानगी घेतली होती का असे सवाल या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांना विचारले असता लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.