महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मंचावर रायगडची तोफ धडाडली!!
उरण दि २५(विठ्ठल ममताबादे )आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्व भूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कोकण विभागाची आढावा बैठक भिवंडी येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची तोफ धडाडली.
आढावा बैठकीसाठी महाराष्ट्राचे नवनियुक्त प्रभारी रमेश चेन्नीथलाजी, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सहप्रभारी आशिष दुवा, काँग्रेस वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, भालचंद्र मुंगणेकर, प्रणितीताई शिंदे, हुसेन दलवाई,चारूलता टोकस, संध्या सौवालाखे, भाई जगताप,चंद्रकांत हंडोरे, श्रीरंग बरगे आदी उपस्थित होते. या सर्वांच्या समक्ष जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी कोकणातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या.कोकणातील सात लोकसभा पैकी मावळ, रायगड व पालघर लोकसभा लढण्यास काँग्रेस सक्षम आहे असे ते म्हणाले. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, वसई विरार, पालघर, रायगड येथील उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून आपल्या भावना वरिष्ठापर्यंत पोहोचवील्या बद्दल प्रतिसाद दिला.आपल्या भावना व्यक्त करताना महेंद्रशेठ घरत म्हणाले की,पक्ष वाढवायचा असेल तर हाताच्या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी सर्व सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे.परंतु वरिष्ठपातळीवर निर्णय होऊन शिवसेना, राष्ट्रवादी किंवा शेकाप उमेदवाराचा प्रचार करावा लागतो. अशाने पक्ष कार्यकर्त्यांना बळ कसे मिळणार ? पक्ष कसा मोठा होणार ? कोकण विभाग इतर पक्षांना आंदन दिला आहे का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. ज्यांनी सत्ता उपभोगली, काँग्रेस पक्षाच्या जीवावर बक्कळ पैसा कमवीला ते स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष सोडून गेले. आम्ही एकनिष्ठ राहून पक्ष टिकवीला, यापुढेतरी वरिष्ठ नेत्यांनी कोकणाकडे दुर्लक्ष करू नये असे महेंद्रशेठ घरत यावेळी म्हणाले.