इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड श्री.प्रितम म्हात्रे यांना जाहीर
"द.बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे सन्मानित"
पनवेल :-दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम रविवार दि. ७ जानेवारी २०२४ रोजी पनवेल मधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मेळावा व आंतरराष्ट्रीय एक्सलन्स पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पत्रकारिता तसेच इतर क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणार्या कर्तृत्ववान महिला व पुरुषांचा या सोहळ्यात आंतरराष्ट्रीय एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास संपूर्ण देशातील
तसेच परदेशातील पुरस्कारार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमात पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते श्री.प्रितम जे.म्हात्रे यांच्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना "इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्डने" संसदरत्न मावळचे खासदार श्री.श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराबद्दल श्री.प्रितम म्हात्रेंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.