महाराष्ट्र हा विकसित भारताचा भक्कम आधारस्तंभ-पंतप्रधान नरेंद्र मोदी

 *प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 35 हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ*


*अटल सेतू देशातील नागरिकांना समर्पित*


*विकसित भारत संकल्प अभियानामध्ये महिलांनी नेतृत्व करावे*


*महाराष्ट्र हा विकसित भारताचा भक्कम आधारस्तंभ*                                  -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी


रायगड दि.12(जिमाका ) :-  महाराष्ट्र शासनामार्फत विविध लोक कल्याणकारी योजना प्रकल्प राबविण्यात येत आहेत. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन समर्पित भावनेने काम करीत असून महाराष्ट्र हा विकसित भारताचा भक्कम आधारस्तंभ बनला पाहिजे, यासाठी केंद्र शासनामार्फत सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे दिली.  तसेच येत्या काळात देशातील 2 कोटी महिलांना लखपती बनविण्याचा केंद्र शासनाचा संकल्प असून विकसित भारत संकल्प अभियानामध्ये महिलांनी नेतृत्व करुन या अभियानाला यशस्वी करावे,  असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.   

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 35 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या अनेक  विकास प्रकल्पांचे उदघाटन , राष्ट्राला समर्पण आणि पायभरणी करण्यात आली.  यामध्ये अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतु, (२२.०० कि.मी.) (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एम.टी.एच.एल.) खारकोपर-उरण रेल्वे लाईन प्रकल्प (१४.६० कि.मी.) ठाणे आणि ऐरोली दरम्यान 'दिघा गाव रेल्वे स्थानक' भारतरत्नम नेस्ट-१ भवन महानगर प्रदेशाच्या पश्चिम उप-प्रदेशासाठी सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (क्षमता ४०३ द.ल.लि.) नवी मुंबई मेट्रो मार्ग-१ बेलापूर ते पेंढार (११.१० कि.मी., ११ स्थानके) खाररोड आणि गोरेगाव दरम्यान नवीन ६ वी रेल्वे लाईन (८.८० कि.मी.) उरण आणि खारकोपर दरम्यान उपनगरीय ईएमयू  ट्रेनची सुरुवात, नमो अभियान - मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान, नारी शक्ती दूत अॅप लेक लाडकी योजनेतील लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप यांचा समावेश आहे. 

यावेळी व्यासपीठावर  महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खनिकर्म राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्याचे सार्वजानिक बांधकाम मंत्री (सार्वजानिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण, कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री, कु.आदिती तटकरे, खा.श्रीरंग बारणे, खा.सुनिल तटकरे, आ.प्रशांत ठाकूर, आ.महेश बालदी आदी उपस्थित होते.  

यावेळी संबोधित करताना प्रधानमंत्री श्री.मोदी म्हणाले की, आजचा दिवस केवळ मुंबई आणि महाराष्ट्रासाठीच नव्हे तर विकसित भारताच्या संकल्पाचा ऐतिहासिक पुरावा आहे.  भारतातील सर्वात लांब असलेल्या अटल सागरी सेतूचे लोकार्पण हा भारताचा विकासाप्रती असलेल्या वचनबध्दतेचा पुरावा आहे.  २०१४ च्या निवडणुकीआधी रायगड किल्ल्यावर गेलो होतो, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन काही संकल्प केले होते. आज ते संकल्प पूर्ण होताना दिसत आहेत. अटल सेतू त्याचाच एक भाग आहे. अटल सेतू बनवण्यासाठी जपान सरकारने योगदान दिले. त्यासाठी मी जपान सरकारचे आभार मानतो.  अटल सेतू ही विकसित भारताची एक झलक आहे. अटल सेतूमुळे गोवा देखील मुंबईच्या जवळ येणार आहे,” अटल सेतू प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प माजी पंतप्रधान शिंझो ॲबे यांच्या समवेत केला होता. सागरी सेतूचं काम पूर्ण होणं, ही मोठी उपलब्धी आहे.  देशासाठी गेल्या 10 वर्षात पायाभूत सुविधांसाठी 44 लाख कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी महाराष्ट्रात केंद्र सरकारने सुमारे 8 लाख कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण केले आहेत आणि आणखी  काम सुरू आहे.  ही रक्कम प्रत्येक क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी वाढवित आहे, असेही ते  म्हणाले. 

स्वच्छता, शिक्षण, वैद्यकीय मदत आणि रोजगाराशी संबंधित योजनांचा  महिलांना सर्वाधिक फायदा झाला असल्याचे सांगून ते म्हणाले, देशात  पीएम जनऔषधी केंद्रे, स्वनिधी, पीएम आवास आणि बचतगटांना मदत मिळून ‘लखपती दीदी’ तयार होत आहेत.  २ कोटी ‘लखपती दीदी’ तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.  महाराष्ट्र शासनाच्या योजनाही याच दिशेने कार्यरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री श्री.शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास गतीने सुरू आहे, शासन याच निष्ठेने महाराष्ट्राच्या विकासासाठी कार्यरत राहील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातील नुकत्याच झालेल्या मेगा विकास प्रकल्पांची उदाहरणे देताना प्रधानमंत्री यांनी बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे उद्घाटन आणि नवी मुंबई विमानतळ आणि कोस्टल रोड प्रकल्पाची कामे सुरू आहेत, यामुळे मुंबईतील कनेक्टिव्हिटीचा चेहरामोहरा बदलेल.  प्रवासाची सोय आणखी वाढविण्यासाठी  इस्टर्न फ्री-वे च्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्हला जोडणाऱ्या भूमिगत रस्त्याचा बोगद्या तयार करण्यात येत आहे.  “लवकरच, मुंबईलाही पहिली बुलेट ट्रेन मिळेल, असेही ते  म्हणाले.


 “दिल्ली-मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉर महाराष्ट्राला मध्य आणि उत्तर भारताशी जोडेल.  महाराष्ट्राला तेलंगणा, छत्तीसगड आणि इतर शेजारील राज्यांशी जोडण्यासाठी ट्रान्समिशन लाईनचे जाळेही टाकले जात आहे.  तेल आणि वायू पाईपलाईन, औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी, नवी मुंबई विमानतळ आणि शेंद्रा-बिडकीन इंडस्ट्रियल पार्कचे मोठे प्रकल्प महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 


*देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचे मोठे योगदान*

                                                   -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


देशाच्या प्रगतीत आणि विकासात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. उद्योगाबरोबरच, प्रकल्पांच्या बांधकामातही महाराष्ट्र हे पायाभूत आघाडीचे राज्य आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या विकासाचा हा प्रवास निरंतर सुरूच राहील. यासाठी केंद्र शासनाचा  नियमित पाठिंबा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना  जयंतीनिमित्त अभिवादन करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) या सहा मार्गिकांच्या समुद्रावरील भारतातील सर्वांत लांब सागरी सेतूला भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. हा पूल अटलजींच्या नावाप्रमाणेच मजबूत आणि अटल आहे. अटलजींचे नाव आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन ही या पुलाच्या मजबूतीची हमी आहे. या सागरी सेतूमध्ये कोणत्याही मोठ्या भूकंपाचा धक्का सहन करण्याची क्षमता आहे. आज देशातील पायाभूत सुविधांची सर्वाधिक कामे महाराष्ट्रात सुरू आहेत. राज्यात सुमारे 8 लाख 35 हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. गुंतवणूकदार राज्यात गुंतवणूक करण्यासाठी स्पर्धा करीत आहेत. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश बुलेट वेगाने प्रगती करत आहे. गेल्या नऊ वर्षांत आपण अनेक सकारात्मक बदल पाहिले आहेत. महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील अडथळेही दूर झाले असून या मार्गासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. जगातील अनेक देश आर्थिक आघाडीवर अनेक समस्यांशी लढत आहेत, तर आपला भारत मजबूत आणि संतुलित नेतृत्वामुळे आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.


*चार वर्षांत मेट्रो आणि रस्त्यांचं नेटवर्क -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 1973 मध्ये या सागरी सेतूची संकल्पना मांडली होती. मात्र 40 वर्षात हे काम झाले नाही, ते आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या दूरदृष्टीमुळे शक्य झाले आहे. या अटल सेतूसाठी प्रधानमंत्री यांनी थेट एम.एम.आर.डी.ए. ला कर्ज उपलब्ध करुन देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

गेल्या 50 वर्षांत महाराष्ट्राला आणि देशाला मुंबईने ताकद दिली. येत्या 25 वर्षांते देशाला, महाराष्ट्राला आणि मुंबईला कोण ताकद देईल तर तो रायगडचा परिसर देईल. रायगडमध्ये नवा इकॉनॉमिक हब तयार होणार आहे. 65 टक्के डेटा सेंटर कॅपासिटी तयार झाली आहे. या सेतूने या विभागाला कनेक्टिव्हिटी दिली आहे.

मुंबईत कुठूनही 59 मिनिटात पोहोचता आले पाहिजे. मेट्रो आणि रस्त्यांचं नेटवर्क त्या पद्धतीने तयार होत आहे. येत्या तीन ते चार वर्षांत असे नेटवर्क तयार होईल”, असे आश्वासनही उपमुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी जनतेला दिले. यापुढे रायगड, नवी मुंबई हे नवे इंडस्ट्रियल हब असेल. येथे नवीन विमानतळ लवकरच पूर्ण होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची शक्ती आमच्यामागे उभी असल्यामुळे राज्यातील पायाभूत प्रकल्प लवकर पूर्ण होतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

 *सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कटीबद्ध - उपमुख्यमंत्री अजित पवार*

कार्यक्रमाच्या स्वागतपर भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आजचा दिवस महत्वपूर्ण आहे. सर्वासामान्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना, प्रकल्प राबविण्यात येत आहेत. भारतीय रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या सुधारणामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळत आहे.

प्रधानमंत्री मोदी यांनी सुरुवातीपासून महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर विशेष लक्ष दिले आहे. उज्वला योजना ही महिलांसाठी अतिशय उपयुक्त ठरली आहे. यामुळे महिलांचे जीवन सुखकर झाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच देशाच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वात कटीबद्ध असल्याचे सांगून राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार  असल्याचा निर्धारही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी व्यक्त केला.