खारघर, कामोठेमधील अनधिकृत टपाऱ्यांवरती कारवाई
पनवेल,दि.15: खारघरमध्ये फूटपाथवरती उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपाऱ्या, नीराकेंद्र, दुकानाबाहेरील शेड, फुटपाथवरील अतिक्रमण तसेच खांदेश्वर रेल्वे स्टेशन बाहेरील अनधिकृत दुकाने,टपऱ्या अशा विविध ठिकाणी खारघर प्रभाग कार्यालय व कामोठे प्रभाग कार्यालयाच्यावतीने आज आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या सूचनेनूसार महापालिकेच्यावतीने तोडक कारवाई करण्यात आली.
खारघरमधील सेक्टर 8ब,सेक्टर 5,सेक्टर 35 ई अशा विविध ठिकाणी फूटपाथवरती अनधिकृत टपाऱ्या उभारण्यात आल्या होत्या. तसेच अनधिकृत नीराकेंद्र, दुकानाबाहेरील वाढवलेले शेड ,हातगाड्याच्या संख्येमध्येही वाढ झाली होती. आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनूसार प्रभाग समिती ‘अ’ चे प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांनी अतिक्रमण विभागाच्यासाह्याने आज या संपुर्ण खारघरमध्ये तोडक कारवाई केली. यावेळी जेसीबीच्या साहाय्याने अनधिकृत टपाऱ्या,दुकाने पाडण्यात आली ,तसेच टपऱ्यांमधील, दुकानांमधील सर्व साहित्य जप्त करण्यात आले.
याचबरोबर प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे यांनी प्रभाग समिती ‘क’च्या अतिक्रमण विभागाच्या मदतीने खांदेश्वर रेल्वे स्थानकाबाहेरील अनधिकृत उभारलेल्या सात टपऱ्यावरती तोडक कारवाई केली.