शहर स्वच्छतेवर अधिक बारकाईने व जबाबदारीने लक्ष देण्याचे नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे निर्देश
राज्यातील कोणत्याही शहरापेक्षा नवी मुंबईमध्ये स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात असून नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रिय सहयोगातून महानगरपालिकेने स्वच्छतेमध्ये आपली कामगिरी नेहमीच उंचावत नेलेली आहे. नवी मुंबईकडून राज्य व केंद्र सरकारलाही स्वच्छता व सुशोभिकरण कामात मोठ्या अपेक्षा असून त्यादृष्टीने स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असल्याने आपण स्वच्छता कार्यवाहीत अधिक प्रभावी काम करण्याची गरज असल्याचे मत नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी व्यक्त करीत अधिक गतीमान होण्याचे निर्देश दिले.
शहर स्वच्छतेच्या अनुषंगाने आयुक्तांनी दोन्ही अतिरिक्त आयुक्त, विभागप्रमुख दर्जाचे नोडल अधिकारी, विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता यांना ऑनलाईन वेबसंवादाव्दारे निर्देश दिले.
सध्याच्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिक पिशव्या न वापरण्याविषयी अधिक प्रभावी जनजागृती करण्यासोबतच प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा तीव्रतेने राबविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे सण-उत्सव काळात लागलेले अनधिकृत शुभेच्छा बॅनरही हटविण्याची व शहर विद्रुपीकरण रोखण्यासाठी ते लागू न देण्याची मोहीम तीव्र करावी असे त्यांनी सूचित केले.
नवी मुंबईचे तलाव ही देखील शहराची एक वेगळी ओळख असून तलावांचे जलाशय नियमित स्वच्छ राहतील याकडे लक्ष देणारी यंत्रणा ज्या भागांमध्ये शिथिल झालेली आहे त्यांना कृतीशील करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. त्यादृष्टीने तलाव स्वच्छ करण्यासाठी ठेवलेल्या तराफ्यांचा दिवसातून 3 ते 4 वेळा वापर करून जलाशय स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष देण्याचे त्यांनी निर्देशित केले. त्याचप्रमाणे नाल्यांवरील नेट्स व नाल्यांमधील स्क्रिन्स आणि रस्त्यांच्या कडेला असलेल्या वॉटर एन्ट्रीज याकडेही विशेष लक्ष द्यावे असे सूचित करण्यात आले आहे.
कचरा गाड्यांच्या वेळांबाबत पुन्हा खातरजमा करून घेण्याचे निर्देश देतानाच आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी कचरा गाड्यांच्या सुव्यवस्थेबाबत तसेच त्यामध्ये कचरा वर्गीकरण करून ठेवला व वाहून नेला जात असल्याबाबत तपासणी करीत रहावी असे सांगितले. मोठ्या सोसायट्यांमधील कचरा विल्हेवाट प्रकल्प तसेच उद्यानांमधील कम्पोस्ट पीट्स याकडेही बारकाईने लक्ष देण्याचे सूचित करतानाच आयुक्तांनी प्रोसेसिंग प्लान्टकडेही विशेष लक्ष देण्याचे निर्देशित केले.
विशेषत्वाने वाणिज्य व व्यावसायिक भागातील साफसफाईकड़े प्राधान्याने लक्ष देण्याचे सूचित करतानाच सध्याच्या सण-उत्सव खरेदीच्या अनुषंगाने मार्केट एरिया नियमित स्वच्छ राहील याकडे बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केली. त्याठिकाणचे लिटर बिन्स, त्यावरील स्टिकर्स, त्यांची स्वच्छता अशा सर्वच बाबींकडे काटेकोर लक्ष देण्याचे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले आहे.
नवी मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या आकर्षक शिल्पाकृतींमुळे शहराला एक वेगळेच आकर्षक दृश्यस्वरूप आले असून या शिल्पाकृतींची स्थिती तपासून घ्यावी व आवश्यकतेनुसार त्यामध्ये तातडीने दुरूस्ती करावी तसेच त्याचा परिसरही सुशोभित करावा असेही निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले.
नवी मुंबई शहराकडे केवळ येथील नागरिकच नव्हे तर शहराला विविध कारणांनी भेटी देणारे नागरिकही स्वच्छ व सुंदर शहर म्हणून बघतात त्यामुळे या शहराचा नावलौकिक सतत राखण्याची व वाढविण्याची आपली जबाबदारी लक्षात घेऊन प्रत्येक घटकाने अधिक कृतीशील व्हावे असे नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी वेबसंवादामध्ये निर्देशित केले.