विविध कला - क्रीडा गुणदर्शनपर स्पर्धांना ज्येष्ठ नागरिकांचा उत्साही प्रतिसाद


 

                                                

 

  विविध कला क्रीडा गुणदर्शनपर स्पर्धांना ज्येष्ठ नागरिकांचा उत्साही प्रतिसाद




 

     नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून प्रतिवर्षीप्रमाणेच ज्येष्ठ नागरिकांच्या अंगभूत कला, क्रीडा गुणांना उत्तेजन देणा-या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये उत्साहाने सहभागी होऊन उत्तम प्रतिसाद देत ज्येष्ठांनी उत्स्फुर्त आनंद घेतला.

विविध 14 कला-क्रीडा प्रकारांत 334 महिला व पुरूष ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी होत या स्पर्धा यशस्वी केल्या. यामधील पारितोषिकप्राप्त ज्येष्ठांचा सन्मान विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे 1 ऑक्टोबर या ज्येष्ठ नागरिक दिनी संपन्न होणा-या विशेष कार्यक्रमाप्रसंगी गौरव केला जाणार आहे.

या स्पर्धांमध्ये नमुंमपा शाळा क्र. 27, सेक्टर-15, वाशी येथे 25 सप्टेंबरला संपन्न झालेल्या कथाकथन स्पर्धेत 16, हास्य स्पर्धेत 5, वेशभुषा स्पर्धेत 7, वैयक्तिक नृत्य स्पर्धेत 3 व टेलिफोन स्पर्धेत 10 ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला.

त्याचप्रमाणे 26 सप्टेंबरला त्याच शाळेत संपन्न झालेल्या एकपात्री अभिनय स्पर्धेत 8, वैयक्तिक गायन स्पर्धेत 37 आणि काव्यवाचन स्पर्धेत 23 ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी होत आपल्यातील कला साहित्य गुणांचे दर्शन घडविले.

दि. 27 सप्टेंबर 2023 रोजी, कैसिताराम मास्तर उद्यान सेक्टर 7 सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र येथे आयोजित कॅरम स्पर्धेमध्ये 125 पुरूष व 4 महिला ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी होत तसेच बुध्दीबळ स्पर्धेमध्ये 22 पुरूष व 3 महिला ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी होत क्रीडागुणांचे प्रदर्शन केले. याशिवाय ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, नागा गणा पाटील उदयान, से-15, सीबीडी बेलापूर येथे 27 सप्टेंबरला झालेल्या ब्रीझ गेम स्पर्धेत 40 ज्येष्ठांनी सहभागी होत हा उपक्रम यशस्वी केला.  

      त्याशिवाय "मी ज्येष्ठ नागरिक बोलतोय….!" याविषयावर आयोजित निबंध स्पर्धेमध्ये 15 तसेच पत्रलेखन स्पर्धेमध्ये कुटूंबातील एका व्यक्तीला पत्र लिहित 16 ज्येष्ठ नागरिकांनी साहित्यगुण दर्शन घडविले.

या सर्व स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणा-या ज्येष्ठ नागरिकांना 1 ऑक्टोबर रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे सन्मानीत केले जाणार असून त्या सोबतच ऑक्टोबर 2022 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेतअशा ज्येष्ठ नागरिकांचा तसेच ऑक्टोबर 2022 ते दि. 30 सप्टेंबर 2023पर्यंत ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या विवाहास 50 वर्ष पूर्ण झालेली आहेतअशा ज्येष्ठ नागरिक दांम्पत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.  

ज्येष्ठ नागरिकांचा यथोचित सन्मान करणारे व त्यांचे जीवन सुखकारक करणारे शहर ही देखील नवी मुंबईची एक वेगळी ओळख असून जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त या कलाक्रीडा गुणदर्शनपर विविध स्पर्धांचे आयोजन ही ज्येष्ठांना अतीव समाधान देणारी गोष्ट असल्याचे सांगत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी ज्येष्ठ नागरिक दिनाच्या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.