रायगड जिल्ह्यातील रातवड येथे पादत्राणे,चर्मोद्योग क्लस्टर;केंद्र शासनाकडून प्रकल्पासाठी १२५ कोटी
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार*
मुंबई, दि.३०: केंद्र शासनाने रायगड जिल्ह्यातील रातवड येथे चर्मोद्योग क्लस्टरला मंजुरी देऊन १२५ कोटीचा निधी दिला आहे. त्यामाध्यमातून चर्मोद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होऊन रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे. या प्रकल्पाला मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
केंद्र शासनाच्या भारतीय पादत्राणे, चर्मोद्योग आणि साहित्या विकास कार्यक्रमाच्या उपयोजनेतून पादत्राणे आणि चर्मोद्योगासाठी हा विशाल समुह प्रकल्प करण्यात येणार आहे. ३२३ कोटींच्या या प्रकल्पासाठी १२५ कोटी रुपये केंद्र शासनाने मंजूर केले आहे. उर्वरित पायाभूत सुविधांच्या खर्चाला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे.
केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी रायगड जिल्ह्यातील रातवाडा औद्योगिक क्षेत्राची निवड केली त्यातून सुमारे २५ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, त्याचबरोबर चर्मोद्योग करणाऱ्या उद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होणार आहे.
राज्यात विविध क्षेत्रात औद्योगिक मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून नुकतेच उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ४० हजार कोटींच्या गुंतणूक प्रकल्पांना मान्यता दिली आहे. लेदर क्लस्टरसाठी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याची निवड केल्याबद्दल पुन्हा एकदा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहे.
००००