भारतीय हवामान विभागाकडून रायगड जिल्ह्यासाठी दि.6 जुलै रोजी रेड अलर्टची पूर्वसूचना
अलिबाग,दि.05(जिमाका):- भारतीय हवामान विभागाकडून दि. 6 जुलै 2023 रोजी रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्टची पूर्वसूचना प्रसारित केली आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून सर्व नागरिकांना व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरडग्रस्त, पूर प्रवण, खाडीलगत सखल भागातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. पुलावरून पाणी वाहत असल्यास धाडसाने वाहने पाण्यातून चालवू नये. मासेमारीसाठी खाडी, तलाव, समुद्रात जावू नये. दरड प्रवण गावातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी आपल्या विभागांच्या यंत्रसामुग्री मनुष्यबळासह तत्पर ठेवाव्यात. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी जवळच्या पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाशी 02141-222097 टोल फ्री नंबरवर 112/1077 आणि जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाशी 02141-228473 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.