एसएससी परीक्षेत नमुंमपा ईटीसी केंद्रातील दिव्यांग मुलांनी उमटविली गुणवत्तेची नाममुद्रा
नवी मुंबई/प्रतिनिधी दरवर्षी प्रमाणेच यावर्षीही नवी मुंबई महानगरपालिकेच्या ईटीसी केंद्रातील कर्णबधीर, अंध, अध्ययन अक्षम, मतिमंद व बहुअपंगत्व अशा सर्व विभागातील दहावीची परीक्षा देणा-या मुलांनी उत्तम यश संपादन केले असून दिव्यांगत्व असले तरी शैक्षणिक प्रगतीत आपण कमी नसल्याचे दाखवून दिले आहे आणि सन 2007 पासून सातत्याने सुरु असलेली 100% उत्तीर्णतेची परंपरा अबाधित राखली आहे. या सर्व गुणवंत व जिद्दी विद्यार्थ्यांचे महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी कौतुक केले आहे.
ईटीसी केंद्रामध्ये शिक्षण घेणारी एकूण 34 मुले एसएससी उत्तीर्ण झाली आहेत. यापैकी अध्ययन अक्षम विभागातील 07, मतिमंद विभागातील 13, कर्णबधीर विभागातील 09 व अंध विभागातील 02 व बहुविकलांग विभागातील 02 आणि स्वमग्नता विभागातील एका मुलाचा समावेश आहे.
यापैकी 83.20% इतके सर्वाधिक गुण अब्दुल रहमाना शिरगावकर या अध्ययन अक्षम विभागातील विदयार्थ्याने मिळवले आहेत. अध्ययन अक्षमता विभागातून इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांसह दहावीसाठी प्रवेश घेत सिद्धेश दगडू सणस या विद्यार्थ्याने 74.20% गुण प्राप्त केले आहेत.
यासोबत कर्णबधीर विभागातून नितीश पासवान, चंदन सरोज, किशन राजभर, मुस्तकीम कुरेशी, आस्था गुप्ता यांनीही चांगले गुण प्राप्त केले आहे. हर्षद थोरात या मुलाने बहुविकलांग असूनही 75% गुण मिळवत गौरवास्पद कामगिरी केलेली आहे. गौरव हेमंत कोळेकर (मराठी माध्यम) व अनिशकुमार ठाकूर (हिंदी माध्यम) या अंध विदयार्थ्यांनीही उत्तम यश संपादन केले आहे. हे दोन्ही विदयार्थी सामान्य शाळेचे विदयार्थी असून त्यांना अधिक अभ्यासक्रमासाठी ईटीसी केंद्रामधून विशेष शिक्षण देण्यात येत होते. त्याचप्रमाणे भावेश सोमभाई बारिया, वैष्णवी संजय सिंग, वरूण रामनरेश राणा, हर्ष जयंत पाथरे, निलेश संतोष कांबळे, आणि राहुल राजेश शिंदे या मतिमंद विभागातील विदयार्थ्यांनी चांगले गुण संपादन केले आहेत.
अध्ययन अक्षमता विभागातील नील रोहित गुलाटी, वरद शशिकांत ठाकूर, निखील कैलाश माने, उदय दिनेश ठाकूर या मुलांनीही उत्तम गुण प्राप्त केले आहेत. ईटीसी केंद्राव्दारे या सर्व मुलांना वेळोवेळी सर्वतोपरी मदत व मार्गदर्शन देण्यात आलेले असल्यामुळेच सर्व विदयार्थ्यांच्या पालकांनी मुलांच्या यशाबाबत आनंद व्यक्त करताना या यशात ईटीसी केंद्राचा खूप मोठा वाटा असल्याचे आवर्जून सांगितले आहे.
ईटीसी केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत यांनी या मुलांच्या यशाबाबत समाधान व्यक्त करताना विदयार्थ्यांची मेहनत, पालकांचे सातत्य, आणि शिक्षक, थेरपिस्ट यांचे प्रयत्न या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणजे हे यश असल्याचे सांगितले. आहे. तसेच यातील बहुतांश विदयार्थ्यांनी एसएससी परीक्षेत प्रथम श्रेणीमध्ये यश मिळवल्यामुळे पुढील महाविदयालयीन शिक्षणाच्या, व्यावसायिक शिक्षणाच्या अनेक संधी त्यांच्यासाठी उपलब्ध होत आहेत. दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी हे यश महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले असून या मुलांना वेळोवेळी प्रोत्साहित करणे तसेच त्यांच्या पालकांना मार्गदर्शन, समुपदेशन करण्याचे काम केंद्रातील मानसशास्त्रज्ञांनी केले आहे.