तब्बल 4 महिने एनआयसीयूमधील नवजात बालकांवर उपचार करून त्यांना जीवनदान देणाऱ्या नमुंमपा नेरुळ रुग्णालयातील वैद्यकीय समुहाची प्रशंसनीय कामगिरी
नवी मुंबई/प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर येत असल्याने या रूग्णालयांतून उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकडे महापालिका आयुक्त श्री राजेश नार्वेकर यांचे बारकाईने लक्ष आहे.
यामध्ये प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात आरोग्य सेवांकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. यामधील एनआयसीयू ही एक अत्यंत महत्त्वाची सुविधा नवजात बालकांसाठी अतिशय महत्त्वाची ठरत आहे.
नेरूळ येथील महानगरपालिकेच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयातील एनआयसीयू मध्ये जन्मल्यापासून फुफ्फुसे पुरेशा प्रमाणात विकसित नसलेली सेक्टर 6 सारसोळे येथील रहिवासी सौ.सान्वी स्वप्नील मोहिते यांची जुळी बालके जीवनाशी तब्बल चार महिन्याची झुंज देत आता बरी होऊन घरी परतली आहेत. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सेस यांनी केलेल्या सुयोग्य उपचारांबद्दल व अविश्रांत मेहनतीबद्दल मोहिते परिवाराच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानण्यात आले असून महापालिका आयुक्त श्री राजेश नार्वेकर यांनीही रुग्णालयाच्या संपूर्ण वैद्यकीय समूहाचे अभिनंदन केले आहे.
सारसोळे येथील सान्वी स्वप्नील मोहिते यांची 10 फेब्रुवारी 2023 रोजी प्रसूती झाली होती आणि जुळी बालके जन्माला आली होती. सामान्यपणे 34 आठवड्यात गर्भातील बाळांची फुफ्फुसे पूर्ण तयार होतात. पण सान्वी यांची बाळे 26 आठवड्यांतच जन्माला आली. त्यामुळे त्यांच्या फुफुसांचा विकास पूर्णत: झाला नव्हता. अशा बाळांचा जीव वाचवणे हे वैद्यकीय समूहासाठी मोठी अशक्यप्राय गोष्ट असते. पण नेरूळ रुग्णालयातील वैद्यकीय समूहाने हे आव्हान पेलायचे ठरवले. रात्रीची डिलिव्हरी झालेली असताना ही जुळी बालके सकाळपर्यंतचा कालावधी काढतील का? अशी शंका असताना त्या बालकांनी जीवनाशी केलेला संघर्ष कमालीचा आहे. बाळांची फुफ्फुसे पूर्णतः तयार झालेली नसल्याने त्यांना व्हेंटिलेटरची गरज होती. महानगरपालिकेच्या वैद्यकीय समूहाने त्यांना लगेच व्हेंटिलेटरवर घेऊन फुफ्फुसे बनण्यासाठीचे अतिशय महागडे असणारे सरफॅक्टन्ट हे इंजेक्शन एनआयसीयूमध्ये मोफत उपलब्ध करून दिले आणि त्या बाळांवर उपचाराला सुरुवात केली. त्या बाळांचा व्हेंटिलेटर ते सईपॅप ते रूम एअर हा प्रवास रुग्णालयातील डॉक्टरांसाठी एक आव्हान आणि थक्क करणारा अनुभव होता. बाळ व्हेंटिलेटरमधून बाहेर पडल्यानंतरही त्याचे वजन वाढवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. यादृष्टीने एनआयसीयू मधील स्टाफ नर्सेसनी घेतलेली मेहनत अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. त्याचप्रमाणे विशेष म्हणजे आपल्या बाळांवर हे मोठे संकट कोसळलेले असताना बाळांच्या आईने सान्वी मोहिते यांनी जो संयम आणि ध्येय दाखवले तेही निश्चितच प्रशंसनीय आहे. तब्बल चार महिने स्वतःचा संयम न गमावता डॉक्टर करीत असलेल्या उपचारांवर विश्वास ठेवून या माऊलीने जो संघर्ष केला तो प्रेरणादायी आहे.
मागील चार महिने यासाठी अथक प्रयत्न करणारे माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालय, नेरूळचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उध्दव खिल्लारे तसेच डॉ. सुषमा तायडे व पिडियाट्रिक प्रा. डॉ. अशोक राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाची भूमिका बजावणारे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत भोसले तसेच डॉ. सुरज घारे, डॉ. मनीषा शिंदे, डॉ.वैभव भगत, डॉ. राजेंद्र बोराडे, डॉ.नम्रता जगदाळे, डॉ. प्रशांत, डॉ.नेहल, डॉ. झानेश्वर मोरे, डॉ.राजकुमार सहानी त्याचप्रमाणे मेट्रन सिस्टर श्वेता वऱ्हाडे, एनआयसीयू प्रमुख सिस्टर शैला व सिस्टर जस्सी आणि सर्व एनआयसीयू स्टाफ यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालय, नेरुळ येथून गेल्या वर्षभरात एनआयसीयू मध्ये 449 बालकांवर उपचार करण्यात आले असून त्यामध्ये 1 कि.ग्रॅ. पेक्षा कमी वजनाच्या 15 बालकांवर तसेच 1 ते 1.5 कि.ग्रॅ. वजनाच्या 51 बालकांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालय सेवेसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.