देशाचे भविष्य घडविणे आपल्याच हातात- वीरमाता अनुराधा गोरे

 देशाचे भविष्य घडविणे आपल्याच हातात- वीरमाता अनुराधा गोरे



अलिबाग, दि.21(जिमाका):- स्वातंत्रपूर्व काळापासून भारतमातेसाठी हजारो जणांनी बलिदान दिले, आपले सर्वस्व पणाला लावले. आज त्यांच्या बलिदानामुळेच आपण इथे सुरक्षित आहोत. त्यांच्या त्यागाची आपण सर्वांनी सतत जाण ठेवायला हवी. आपल्याला आपल्या देशाचे भविष्य घडविण्याची संधी मिळत आहे. हे भविष्य घडविणे, आपल्याच हातात आहे, असे युवा-युवतींना प्रेरित करणारे वक्तव्य वीरमाता अनुराधा विष्णू गोरे यांनी युवा दिनाच्या सांगता समारंभानिमित्ताने काल (दि.20 जानेवारी) येथे केले . 

        येथील भाग्यलक्ष्मी हॉल येथे नेहरू युवा केंद्र रायगड ,जिल्हा माहिती कार्यालय, रूरल यंग फाउंडेशन रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद युवा सप्ताहानिमित्त शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री वीरमाता अनुराधा विष्णू गोरे यांच्या "देशाचे भविष्य तुमच्या हाती" या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या.

      यावेळी व्यासपीठावर वीरमाता अनुराधा गोरे यांच्या शालेय माजी विद्यार्थिनी असलेल्या मेजर डॉ. आश्लेषा तावडे, नेहरू युवा केंद्र रायगड चे जिल्हा समन्वयक निशांत रौतेला, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, रूरल यंग फाउंडेशनचे संस्थापक सुशील साईकर, अध्यक्ष कमलेश ठाकूर,  विद्या पाटील हे मान्यवर उपस्थित होते.

       सैन्यदलात जायचे असेल तर अभिमानाने जा. स्वतःवर विश्वास असेल तरच देशसेवा घडेल. तिथे स्व-हितापेक्षा देशहितालाच प्राधान्य द्या. आपला देश, आपली मातृभूमी, आपले आईवडील, गुरू यांना कधीही विसरू नका, त्यांना कधीही अंतर देऊ नका, या शब्दात वीरमाता अनुराधा गोरे यांनी उपस्थित युवक-युवतींना प्रेरित करून भारतीय सैन्याने विविध युद्धात केलेल्या पराक्रम आणि बलिदानाविषयीच्याही आठवणी विविध युद्ध प्रसंग सांगून जागविल्या. 

      मेजर डॉ.आश्लेषा तावडे-केळकर मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, देशसेवा करण्यासाठी प्रत्येकाला सैन्यात जायला मिळतेच असे नाही. परंतु आपण जी नोकरी, काम, व्यवसाय करतो, त्यातच प्रामाणिकपणा जपावा. त्यात कोणतीही फसवणूक नको. मग जे घडेल त्यात स्वहितापेक्षा अधिक समाजहित आणि देशहित नक्कीच असेल. 

    युवकांनी स्वतःशी प्रामाणिक राहून समाजहित व देशहिताला प्राधान्य द्यावे. देशसेवा करण्यासाठी विविध  सेवामार्ग खुले आहेत, त्यासाठी जिद्दीने अभ्यास करा, आत्मविश्वासाने, पूर्ण तयारीने विविध स्पर्धात्मक परीक्षांना सामोरे जा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी उपस्थित युवा-युवतींना केले.  

       कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतमाता, स्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या  प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला.    

     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशील साईकर, सूत्रसंचालन प्रवीण म्हात्रे, यांनी केले तर आभार घन:श्याम गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता श्रुती बोन्द्रे यांच्या सुमधुर आवाजातील "संपूर्ण वंदे मातरम" ने करण्यात आली. 

    या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण नेहरू युवा केंद्र, रायगड आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या फेसबुक पेजवरूनही करण्यात आले होते.

      अतिशय शिस्तबद्ध आयोजन असलेल्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी, महाविद्यालयीन युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक समाजातील काही प्रतिष्ठित नागरिक, नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक, शासकीय अधिकारी- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Popular posts
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा;फलटणच्या रंजीत जाधवचा सायकल प्रवास :
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नामकरण वाद उच्च न्यायालयात;केंद्र सरकारची भूमीका होणार स्पष्ट.
Image
भविष्यात येणाऱ्या सर्व शैक्षणिक अडचणींमधे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष विद्यार्थ्यांच्या सोबत उभा राहील - शिवसेना उपनेते बबनदादा पाटील
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेलचा ओंकारेश्वर आगमन सोहळा संपन्न;श्री.प्रितमदादा म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती
Image