अवैध मद्य विक्रीबाबत तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाशी तात्काळ संपर्क साधावा- राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे
लिबाग,दि.28(जिमाका): नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता रायगड-अलिबाग राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील अवैध मद्य निर्मिती, वाहतूक विक्री तसेच हातभट्टी ठिकाणांवर कारवाई करण्याकरिता या विभागाच्या भरारी पथकाबरोबर विशेष गस्ती पथकांची नेमणूक करण्यात आली असून परराज्यातून येणाऱ्या संशयित वाहनांची तसेच संशयित ढाबे, हॉटेल यांची तपासणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
नववर्षानिमित्त जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यातील हॉटेल, कॉटेज तसेच इतर ठिकाणी या विभागाची तात्पुरती क्लब अनुज्ञप्ती प्राप्त करूनच कार्यक्रम आयोजित करण्यांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीने नेमण्यात आलेल्या विविध पथकांद्वारे अशा ठिकाणांची नियमित पाहणी करण्यात येणार असून नियमबाह्य कृती आढळल्यास त्यांच्यावर मुंबई दारूबंदी अधिनियम 1949 नुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच विधीग्राह्य परवान्याशिवाय अशा प्रकारच्या पार्टीचे नियोजन केल्याचे आढळून आल्यास आयोजकाबरोबर उपस्थित सर्वांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
अवैध मद्य विक्रीबाबत कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 तसेच अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, रायगड येथील दूरध्वनी क्रमांक 02141-228001 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी केले आहे.