चालू वर्षातील शेवटची स्टेशन कन्सल्टिटेटिव्ह कमिटीची बैठक संपन्न;आमंत्रण पाठवून सुद्धा पनवेल महानगरपालिकेची दांडी

चालू वर्षातील शेवटची स्टेशन कन्सल्टिटेटिव्ह कमिटीची बैठक संपन्न;आमंत्रण पाठवून सुद्धा पनवेल महानगरपालिकेची दांडी

डी सी एम दीपक शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत झाली मुद्देसूद चर्चा


पनवेल (प्रतिनिधी) -सेंट्रल रेल्वेच्या पनवेल स्टेशन कन्सल्टिटेटिव्ह कमिटीची बैठक बुधवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी स्टेशन मास्तर यांच्या दालनात संपन्न झाली. चालू वर्षातील ही अखेरची बैठक होती. विभागीय वाणिज्य व्यवस्थापक दीपक शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत स्थानक सल्लागार समितीने सुचविलेल्या प्रत्येक मुद्द्यावर विस्तृत चर्चा संपन्न झाली. आज पर्यंतच्या स्थानक सल्लागार समितीच्या बैठकांच्यात आजची बैठक ही वैशिष्ट्यपूर्ण झाली कारण विस्तृत, मुद्देसूद, नियम अनुरूप आणि सकारात्मक अशी चर्चा झाली असल्याचे स्थानक सल्लागार समितीचे सदस्य तथा पनवेल प्रवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भक्तीकुमार दवे म्हणाले.

          या बैठकी करता पनवेल प्रवासी संघाचे सदस्य सुरुवातीपासूनच जुन्या पनवेल दिशेने वाहतुकीच्या कोंडीच्या मूळ मुद्द्यावरती प्राधान्यक्रम ठेवून होते. बैठकीच्या किमान दहा दिवस अगोदर पनवेल महानगरपालिका, आर टी ओ आणि ट्रॅफिक अशा खात्यांना पत्र लिहून त्यांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहतील अशी तजवीज केली गेली. स्टेशन मॅनेजर जे पी मीना यांनी या तिन्ही स्थापनाना पत्र लिहून स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमण याबाबत अवगत केले होते. वास्तविक तीस तारखेच्या बैठकीमध्ये या आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणे क्रमप्राप्त होते. परंतु पनवेल महानगरपालिकेच्या वतीने विनंती अर्जाची आणि निमंत्रणाची कुठलीही दखल घेतली गेली नाही. अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावरती आणि प्रवासी बांधवांना भेडसावणाऱ्या समस्येचे निराकरण करण्याकरता पनवेल महानगरपालिकेने अक्षरशः दांडी मारली.

       स्थानिक सल्लागार समितीच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांच्या निवेदनातील प्रत्येक मुद्द्यावर दीपक शर्मा यांनी विस्तृत चर्चा केली. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना या बैठकीमध्ये पाचारण करण्यात आले होते. अत्यंत शांत पद्धतीने संयम राखत दीपक शर्मा यांनी प्रत्येक सूचनेचे पृथक्करण केले.

नजीकच्या काळामध्ये पनवेल रेल्वे स्थानकात अमुलाग्र बदल होणार आहेत. ए दर्जा प्राप्त पनवेल रेल्वे स्टेशन आता ए वन दर्जाधारक झालेले आहे. डेडिकेटेड फ्रिट कॉरिडोर अर्थात मालवाहतुकीसाठी राखीव लोहमार्ग प्रकल्प पनवेल येथून जात असल्याकारणाने पनवेल स्टेशन परिसरात लवकरच बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. स्थानक परिसरातील कार्यालयांकरिता नवीन इमारत बांधून तयार झालेली आहे, बहुतांश कार्यालय तेथे हलविण्यात आलेली असून पुढच्या दोन महिन्यात जवळपास सर्व कार्यालये येथे कार्यान्वित केली जातील.

         अनेक प्रलंबित मागण्यांचे बाबत डॉक्टर भक्ती कुमार दवे आणि श्रीकांत बापट यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने स्थानक सल्लागार समितीच्या सूचना मांडल्या. पनवेल - नवीन पनवेल यांना जोडणारा भुयारी मार्ग, प्रीपेड रिक्षा थांबा, हार्बर रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण यांच्यावर सखोल चर्चा करण्यात आली. तर फलाट क्रमांक सहा आणि सात वर लिफ्ट, १२० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नव्याने इन्स्टॉलेशन, फलाट क्रमांक पाच सहा आणि सात वर बैठक व्यवस्थेकरता अतिरिक्त बाकडे, तीनही फलाटांच्या दोन्ही बाजूस शौचालये, भिंतीवर दोन्ही बाजूस अपडेटेड वेळापत्रक अशी कामे डिसेंबर महिन्याच्या अंतापर्यंत पूर्ण होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

        दादर सावंतवाडी आणि दादर रत्नागिरी या गाड्या रसायनी स्थानकावर थांबल्या पाहिजेत अशी आग्रही भूमिका स्थानक सल्लागार समितीने मांडली, तर दुसऱ्या झोन मधील अधिकारी पनवेल गोरखपुर गाडी सुरू करू शकत असतील तर आपण देखील अन्य झोन करता गाड्या सुरू करण्यास आग्रही राहिले पाहिजे असा युक्तिवाद करत डॉक्टर भक्ती कुमार दवे यांनी रेल्वे प्रशासनास चपराक दिली. अहमदाबाद चेन्नई, पनवेल पुणे पॅसेंजर, लोकमान्य टिळक टर्मिनस ते हुबळी व्हाया पनवेल कर्जत सोलापूर या गाड्या सुरू करण्याबाबत स्थानक सल्लागार समिती बैठकीत मागणी करण्यात आली.

       या बैठकीला विभागीय वाणिज्य व्यवस्थापक दीपक शर्मा, पनवेल प्रवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा स्थानिक सल्लागार समिती सदस्य डॉक्टर भक्तीकुमार दवे, सचिव श्रीकांत बापट, उपाध्यक्ष यशवंत ठाकरे, एरिया मॅनेजर ए राजेश, स्टेशन मॅनेजर जगदीश प्रकाश मीना, कमर्शियल स्टेशन मॅनेजर सुधीर कुमार, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य डॉक्टर मधुकर आपटे, मंदार दोंदे,निलेश जोशी, विलास दातार, संतोष पाटील, सुनील रानडे, रेल्वे प्रशासनाच्या वतीने एपी मीना, आनंदकुमार,पी एन  पाईकराव, सी आर पी एफ चे जसबीर राणा, जनरल रेल्वे पोलीस चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी, एस व्ही मोंढे, आर के नायर,एल एच डोरके, राजेश सिंग आणि असिस्टंट आरटीओ गजानन ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.

चौकट

मी दीपक शर्मा यांचे अभिनंदन करतो तसेच त्यांचे आभार देखील मानतो. कारण आजपर्यंतच्या माझ्या स्थानक सल्लागार समितीच्या बैठकांच्या अनुभवाचा विचार केला असता आजची बैठकी अत्यंत सकारात्मक मुद्देसूद आणि सखोल स्वरूपाची झाली. केवळ सूचना आणि तक्रारी यावर भर न देता सोल्युशन मोडवर आज चर्चा झाल्यामुळे प्रवासी बांधवांना आजच्या बैठकीचा निश्चितच फायदा होईल.

डॉ. भक्तिकूमार दवे.

चौकट

तूर्तास पनवेल स्थानकामध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांचे करता तीन लोहमार्ग आणि मालगाड्यांकरिता  तीन लोहमार्ग असे सहा लोहमार्ग कार्यान्वित आहेत. परंतु साधारणपणे 85 मालगाड्या आणि 60 लांब पल्ल्याच्या गाड्या 24 तासात पनवेल स्थानकातून ये जा करतात. सध्या पनवेल रेल्वे स्थानकातील लांब पल्याच्या गाड्यांवर वेळापत्रक पाळण्याच्या दृष्टीने दबाव पडतो आहे. त्यामुळे डेडिकेटेड फ्रिट कॉरिडोर लवकरात लवकर निर्माण होणे गरजेचे झाले आहे.

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image
फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा -एंजेल वनचे आवाहन
Image