विजयादशमीला भ्रष्टाचाराच्या भस्मासुराचे दहन करणार
किरीट सोमय्या यांचे प्रतिपादन; पनवेलमध्ये गरबाप्रेमींसह धरला ठेका
पनवेल(प्रतिनिधी) विजयादशमीला रावण दहनासोबतच महाराष्ट्राला जो शाप आहे त्या भ्रष्टाचारी भस्मासुराचेदेखील दहन करणार असल्याचे भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. ते पनवेलमध्ये आयोजित नवरात्रोत्सवात शनिवारी (दि. 2) बोलत होते.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शनिवारी रात्री पनवेलमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळ आयोजित झंकार नवरात्रोत्सवाला भेट दिली. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
पनवेलमध्ये एवढा भव्यदिव्य दांडिया फक्त आणि फक्त आमदार प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर हेच आयोजित करू शकतात, असे सांगत किरीट सोमय्या यांनी नवरात्रोत्सवाच्या आयोजनाबद्दल कौतुक केले तसेच दोन वर्षांनी दांडिया खेळून मला खूप आनंद झाला, तुम्हालाही मजा आली ना, असे म्हणत त्यांनी उपस्थितांशी रंगमंचावरून संवाद साधला व गरब्याच्या तालावर ठेका धरला. एवढ्यावरच न थांबता सोमय्या यांनी रंगमंचावर येऊन एक्स्प्रेस दांडियाच्या वाद्यवृंदासोबत ड्रम सेट वाजवण्याचाही मनमुराद आनंद लुटला.