नमुंमपा शाळांतील 5000हून अधिक विद्यार्थी लुटतात फिफा फुटबॉल स्पर्धेतील आंतरराष्ट्रीय सामन्यांचा आनंद

 

नमुंमपा शाळांतील 5000हून अधिक विद्यार्थी लुटतात फिफा फुटबॉल स्पर्धेतील आंतरराष्ट्रीय सामन्यांचा आनंद





 नवी मुंबई (प्रतिनिधी)-यावर्षी “17 वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022 (FIFA U-17 Women’s Football World Cup 2022)” भारतात संपन्न होत असून देशातील 4 शहरांमध्ये नवी मुंबई हे देखील या स्पर्धेचे यजमान शहर आहे. 12 ऑक्टोबर रोजी स्पेन आणि कोलंबिया तसेच मेक्सिको व चीन पीआर या संघांमधील लढती उत्साहात संपन्न झाल्या. त्याचप्रमाणे 15 ऑक्टोबर रोजी चीन पीआर वि. कोलंबिया तसेच स्पेन वि. मेक्सिको या लढतींनाही फुटबॉल रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 18 ऑक्टोबर रोजी चीन पीआर वि. स्पेन आणि टान्झानिया वि. कॅनडा या 2 संघांमधील उत्कंठावर्धक सामन्यांचा क्रीडा रसिकांनी आनंद लुटला.

नवी मुंबईमध्ये जागतिक दर्जाच्या महिला फुटबॉलपट्टू या स्पर्धेच्या निमित्ताने येत असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वैकर यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सामन्यांचा आनंद घेता यावा याकरिता सामने असलेल्या प्रत्येक दिवशी 5 हजाराहून अधिक विद्यार्थी, विद्यार्थिंनींना डॉ. डि.वाय.पाटील स्टेडियम नेरुळ येथे सामने बघण्याची विनामूल्य सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आत्तापर्यंत 12, 15 व 18 ऑक्टोबर रोजी झालेले सामने बघण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका शाळेमधील विद्यार्थी, विद्यार्थिनी उत्साहाने उपस्थित होते. हे 17 वर्षाखालील महिलांचे सामने असल्याने विद्यार्थिनींनी जल्लोष करीत या सामन्यांचा आनंद घेतला.

महानगरपालिका शाळांमधील मुले ही सर्वसाधारण घरातील असल्याने अशाप्रकारे डॉ. डि.वाय.पाटील स्टेडियम सारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात जाऊन त्याठिकाणी जागतिक स्तरावरील सामने बघता येत आहेत याचा विशेष आनंद या मुलांच्या चेह-यावर प्रदर्शित होताना दिसत आहे. अनेक मुलांनी तर पहिल्यांदाच स्टेडियममध्ये बसून सामने बघण्याचा आनंद घेतला. महानगरपालिका शाळेतील या मुलांना शाळेपासून स्टेडियम पर्यंत नेण्यासाठी व सामने संपल्यानंतर स्टेडियमपासून शाळेपर्यंत जाण्यासाठी आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार परिवहन व्यवस्थापक तथा शिक्षण विभागाचे उप आयुक्त श्री. योगेश कडुसकर यांच्यामार्फत सुयोग्य व्यवस्था करण्यात आली आहे. क्रीडा विभागाचे उप आयुक्त श्री. सोमनाथ पोटरे यांच्या नियंत्रणाखाली क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव आणि विभागामार्फत मुलांच्या अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

महानगरपालिका शाळांतील इयत्ता 5 वी ते 10 वी चे विद्यार्थी व विद्यार्थिंनींना हे सामने पाहण्यासाठी महानगरपालिकेने व्यवस्था केली असून फिफा व्यवस्थापनाने भारतातील मुलांमध्ये खेळाची आवड वाढीस लागावी याकरिता मुलांना विनामूल्य सामने बघण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या मुलांसाठी स्टेडियममध्ये स्वतंत्र स्टॅंडमध्ये बैठक व्यवस्था कऱण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांनाही सामने बघण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

या मुलांना नेण्या-आणण्याचे सुयोग्य नियोजन करण्यात आले असून वाहतुक पोलीस उपआयुक्त श्री. पुरुषोत्तम कराड यांच्या नियंत्रणाखाली विद्यार्थ्यांच्या बसेसच्या पार्कींगची योग्य व्यववस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे स्वतंत्र बस मार्गीका कार्यान्वित ठेवण्यात आलेली आहे.

यजमान शहर म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात मुख्य ठिकाणी फुटबॉलची भित्तीचित्रे तसेच शिल्पाकृती उभारलेल्या असून शहरामध्ये फुटबॉलचा माहौल निर्माण करण्यात आलेला आहे. संपूर्ण जगभरातून विविध देशातून नवी मुंबईत येणा-या विविध संघांना मुख्य सामन्यापुर्वी सराव करता यावा म्हणून सेक्टर 19 ए नेरुळ येथे विकसित करण्यात आलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल क्रीडांगण अद्ययावत करण्यात आले आहे. याठिकाणी सराव केलेल्या स्पेन, चीन पीआर, कोलंबिया व इतर अनेक संघांनी सरावानंतर या मैदानाचे व येथील व्यवस्थेचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे.

नवी मुंबई शहरामध्ये विविध खेळांमध्ये रुची असणारे व गुणवत्ता सिध्द करणारे अनेक खेळाडू असून नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधील अनेक विद्यार्थ्यांनीही विविध खेळांमध्ये कर्तृत्व गाजविलेले आहे. फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ असून नवी मुंबईतील विद्यार्थ्यांमध्ये या खेळाविषयी आवड निर्माण व्हावी व या खेळामध्ये रस घेणा-या विद्यार्थी खेळाडूंना जागतिक दर्जाच्या खेळाडूंचा खेळ प्रत्यक्ष बघता यावा यादृष्टीने फिफा संयोजकांच्या सहकार्याने नवी मुंबई महानगरपालिकेने विद्यार्थ्यांना हे सामने बघण्याची संधी उपलब्ध करून दिली असून याव्दारे विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांचा विकास होईल असा विश्वास महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे.