सर्वांच्या एकात्म सहभागातून नवी मुंबईतील प्रत्येक घरावर तिरंगा फडकेल आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांचा विश्वास
आपल्या भारतीयांमध्ये देशभक्ती उपजतच असून देशप्रेमाची उज्वल परंपरा आपल्याकडे आहे. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण देशभरात देशभक्तीची एक उत्साही लाट उसळलेली दिसत आहे. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही विविध स्तरांवर अभिनव उपक्रम राबविले जात असून त्याला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद लाभताना दिसत आहे असे सांगत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी प्रत्येक महापालिका अधिकारी, कर्मचा-याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जे जे नाविन्यपूर्ण करावेसे वाटेल ते ते ध्वज संहितेचे पालन करून करावे व या कामांमध्ये लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, नागरिक यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग करून घ्यावा आणि नवी मुंबईतील एकात्म संस्कृतीचे दर्शन घडवावे अशा सूचना दिल्या.
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटरमध्ये आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधत त्यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजन करावयाचा स्वराज्य महोत्सव तसेच घरोघरी तिरंगा उपक्रम याविषयी मार्गदर्शन केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध पातळ्यांवर आयोजित केल्या जात असलेल्या मोठ्या प्रमाणावरील कार्यक्रमांमुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील 1942 च्या चळवळीसारखे देशभक्तीने भारलेले वातावरण सगळीकडे दिसत असल्याचे अधोरेखित करीत आयुक्तांनी ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महानगरपालिकेप्रमाणेच स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी, विविध संस्था, मंडळे, नागरिक मोठ्या उत्साहाने पुढाकार घेऊन काम करीत असल्याचे विशेषत्वाने नमूद केले. ही एकात्मतेची भावना हीच आपल्या नवी मुंबईची व देशाची ओळख असून स्थानिक पातळीवर काम करताना सर्वांना सोबत घेऊन हा उपक्रम यशस्वी करावा असे आयुक्तांनी अधिकारी, कर्मचारी यांना सूचित केले.
‘घरोघरी तिरंगा’ या उपक्रमांतर्गत नवी मुंबईतील 100 टक्के घरांवर 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत तिरंगा फडकला पाहिजे हे आपले उद्दिष्ट असून त्यादृष्टीने सर्वांची मदत घेऊन प्रत्येक घरापर्यंत पोहचण्याचे नियोजन करा असे आयुक्तांनी सांगितले. प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरावर फडकविण्यासाठी स्वयंस्फुर्तीने झेंड़ा खरेदी करणे अपेक्षित असून ज्यांना खरेदी करणे शक्य नाही अशा अल्प उत्पन्न गटाच्या भागात महानगरपालिकेच्या वतीने झेंडे वितरित करण्यात येत आहेत. झेंडे संग्रहित व वितरित करताना झेंड्याचा ध्वजसंहितेनुसार यथोचित सन्मान राखला जाईल याची काटेकोर दक्षता सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी घ्यावी असे स्पष्ट करीत आयुक्तांनी 15 ऑगस्ट नंतर नागरिकांनी आपला झेंडा घरात सन्मानपूर्वक सुरक्षितपणे जतन करून ठेवावा हा संदेश लोकांपर्यंत पोहचविण्याच्या सूचना दिल्या. याबाबत महानगरपालिकेच्या वतीने माहितीपत्रकही प्रसिध्द करण्यात आले असून त्याचेही वितरण झेंड्यासोबत तसेच सोशल माध्यमांवरून व्यापक स्वरूपात करावे असेही यावेळी सूचित करण्यात आले.
‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमांतर्गत नागरिक स्वत: हे ध्वज खरेदी करु शकतात तसेच एकमेकांना भेटही देऊ शकतात. त्याचप्रमाणे विविध उदयोग, संस्था त्यांच्या सीएसआर निधीतून तसेच व्यक्ती त्यांच्यामार्फत नागरिकांना ध्वज उपलब्ध करुन देऊ शकतात. भारतीय राष्ट्रध्वजाविषयी आपला आदर व प्रेम प्रकट करण्यासाठी नागरिक राष्ट्रध्वजासोबत सेल्फी काढून महानगरपालिकेच्या @NMMConline या फेसबुक पेजला आपला फोटो टॅग करून व्यापक प्रसिध्दी मिळवू शकतात, तसेच समाज माध्यमांवरून डिजीटल राष्ट्रध्वज एकमेकांना भेट देऊ शकतात. आपल्या पोषाखावर मेटल ध्वज परिधान करून देशप्रेम व्यक्त केले जाऊ शकते. अशा विविध पर्यायांचा उपयोग करून नागरिकांनी देशाभिमान प्रकट करावा असे आवाहन आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले.
याप्रसंगी भारतीय संविधानातील उद्देशिकेचे आयुक्तांसमवेत सामुहिक वाचन करण्यात आले. तसेच आयुक्त महोदयांना तिरंगा झेंड्याची आकर्षक फ्रेम अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी ‘वंदे मातरम्’ च्या जयघोषात आयुक्तांसमवेत सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे तिरंगा हातात धरून समुह छायाचित्र काढण्यात आले.