डायलेसिस रुग्णांना एसटी प्रवास मोफत करण्याची आ. महेंद्र दळवींची मागणी
सचिन पाटील (अलिबाग)रायगड: ग्रामीण भागात डायलेसिस सुविधा नसल्याने अनेक रुग्णांना डायलेसिस सेंटरपर्यंत आठवड्यातून दोन ते तीन वेळा जावे लागते. गरीब कुटुंबातील रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना हा खर्च न परवडण्यासारखा असल्याने राज्य सरकारने अशा रुग्णांचा आणि त्याच्या सोबत जाणाऱ्या एका व्यक्तीचा एसटी प्रवास मोफत करावा, अशी मागणी अलिबाग-मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनी केली आहे.
डायलेसिस ही दीर्घकाळ चालणारी उपचार पद्धत असल्याने गरीब कुटुंबातील रुग्णांना डायलेसिस सेंटरपर्यंत जाण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. डायलेसिस सुविधा ही मोठ्या शहरातच असल्याने महाराष्ट्राच्या अनेक तालुक्यातून मुंबई, पुण्यासारख्या सुविधा असणाऱ्या शहरापर्यंत प्रवास करावा लागतो. दर आठवड्याला खासगी वाहनातून करावा लागणारा प्रवासाचा खर्च ग्रामीण भागातील नागरिकांना न परवडण्यासारखा आहे. या खर्चातून दिलासा देण्यासाठी एसटी महामंडळा मार्फत सुविधा सुरु करावी, अशी मागणी आ. महेंद्र दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. आपले सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार असून आपण महाराष्ट्रातील जनतेचे कुटुंब प्रमुख ही सुविधा सुरु करणे गरजेचे असल्याचे म्हणणे आ. महेंद्र दळवी यांचे आहे. या सुविधेमुळे राज्यातील हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.