नमुंमपा पदव्युत्तर पदवी (PG) मेडिकल कॉलेज सुरु करण्यास केंद्रीय आरोग्य विभागाचे ना हरकत पत्र

 

   

 

नमुंमपा पदव्युत्तर पदवी (PG) मेडिकल कॉलेज सुरु करण्यास केंद्रीय आरोग्य विभागाचे ना हरकत पत्र




 

नवी मुंबईकर नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता महानगरपालिकेच्या रुग्णालयांचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात येत असून याकरिता महानगरपालिकेचे स्वत:चे पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय (Post Graduate Institute of Medical Science) सुरु करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक कार्यवाही करण्यात आलेली आहे.

यादृष्टीने मे 2023 च्या शैक्षणिक सत्रात मेडिकल कॉलेज सुरु करून त्यामध्ये पदव्युत्तर पदवी (PG) अभ्यासक्रमाची पहिली बॅच सुरु करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आलेले आहे. याकरिता शासकीय व आरोग्य विभागाच्या आवश्यक असणा-या परवानग्या प्राप्त करून घेण्याकडे प्राधान्याने लक्ष दिले जात आहे. या अनुषंगाने *केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय (Post Graduate Institute of Medical Science) सुरु कऱण्यास ना हरकत  पत्र  महानगरपालिकेस प्राप्त झाले असून मेडिकल कॉलेज सुरु करण्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची परवानगी प्राप्त झालेली आहे.*

या नियोजित पीजी मेडीकल कॉलेजमध्ये पहिल्या टप्प्यात मेडिसीन, सर्जरी, ऑर्थोपॅडीक, गायनॅकोलॉजी व पिडीयाट्रीक अशा 5 शाखा सुरु कऱण्यात येणार असून आगामी काळात टप्प्याटप्प्याने इतर शाखा सुरु करून एकूण 11 शाखा सुरु कऱण्याचे प्रस्तावित आहे. या अनुषंगाने स्वतंत्र जागा शोधून त्याठिकाणी प्रशासकीय व निवासी संकुल (हॉस्टेल) व्यवस्था करण्याचेही नियोजन करण्यात येत आहे.

याबाबतच्या कार्यवाहीसाठी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन कऱण्यात आली आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांचा समावेश असून महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. या समितीने पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय (Post Graduate Institute of Medical Science) सुरु कऱण्याबाबतचा आपला सविस्तर प्रकल्प अहवाल महापालिका आयुक्तांकडे सादर केला होता.

त्या प्रकल्प अहवालावर सविस्तर चर्चा करून पहिल्या टप्प्यात 5 शाखा सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यासोबतच मेडिकल कॉलेज सुरु करण्यासाठी आवश्यक परवानग्या प्राप्त करून घेणे आणि मेडिकल कॉलेज सुरु करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्धता व साधनसामुग्री व्यवस्था करणे याबाबत एकाचवेळी समांतरपणे कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले होते.

त्यानुसार *केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाकडे मेडिकल कॉलेज सुरू करणेविषयी मान्यता मिळणेकरिता विनंतीपत्र सादर करण्यात आले होते. त्या अनुषंगाने ना हरकत पत्र प्राप्त झालेले असून मेडिकल कॉलेज सुरु करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचा टप्पा पार करण्यात आलेला आहे. अशाच प्रकारे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याकडेही वैद्यकीय महाविद्यालय नोंदणीची कार्यवाही गतीमानतेने करून घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.*

*पहिल्या टप्प्यात नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी व नेरुळ या रुग्णालयात मेडिसीन, सर्जरी, ऑर्थोपॅडीक, गायनॅकोलॉजी व पिडीयाट्रीक अशा 5 शाखा सुरु करण्याकरिता आवश्यक कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. या पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये (Post Graduate Institute of Medical Science) प्रशिक्षित एमबीबीएस डॉक्टर पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी येतील व नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातील रुग्णांवरील उपचारांसाठी या प्रशिक्षित डॉक्टर्सचा उपयोग होईल.*

याव्दारे महापालिका रूग्णालयात सर्जिकल इन्टेसिव्ह केअर, मेडिकल इन्टेसिव्ह केअर, पिडीयाट्रीक इन्टेसिव्ह केअर, इमर्जन्सी ॲण्ड ट्रॉमा सर्व्हिसेस अशा सुपर स्पेशालिटी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून महानगरपालिकेच्या आऱोग्य विभागाचे सक्षमीकरण होणार असून नवी मुंबईकर नागरिकांना महानगरपालिका रुग्णालयात अधिक उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.*


Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image
फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा -एंजेल वनचे आवाहन
Image