नवीन पनवेल परिसरातील खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक
नवीन पनवेल (मयूर तांबडे)- नवीन पनवेल परिसरातील खड्ड्यांविरोधात मनसेने अनोखे आंदोलन करून खड्ड्यात चहा बनवून सिडको अधिकाऱ्यांना पाजन्याचा प्रयत्न केला आहे.
पनवेल महानगरपालिका परीक्षेत्रामध्ये रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. याकडे पालिका प्रशासन आणि सिडको प्रशासन यांचे कोणतेही लक्ष नसल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अनेक वेळा अपघात होतात. यात काहींना अपंगत्व येते. याची दखल घेत पनवेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक अनोखे आंदोलन करण्यात आले. नवीन पनवेल सिडको कार्यालयाबाहेर खड्ड्यामध्ये चहा बनवून ती सिडकोच्या अधिकाऱ्यांना पाजण्यात आली. यावेळी पनवेल शहर मनसेचे योगेश चिले, पराग ब्लड, अतुल चव्हाण, अनिकेत मोहिते व कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे जाऊन जर याबाबत सिडकोने गांभीर्याने दखल घेऊन येथील रस्ते सुधारले नाहीत, तर सिडकोच्या कार्यालयात जाऊन चहा बनवून पाजू असा इशाराच यावेळी मनसे कडून देण्यात आला आहे.